धुळे महापालिका निवडणूक 2018: धुळ्यात भाजप विरुद्ध स्वाभिमानी भाजप संघर्ष टोकाला
हा सामना भाजपसाठी केवळ एका शहराचा विषय राहिला नाही. तर, आमदार अनिल गोटे यांच्यामुळे तो राज्यस्तरावरचाही झाला आहे. पक्षनेतृत्व यावर काय तोडगा काढणार यावर अनेक कार्यकर्त्यांचे भविष्य ठरणार आहे.
राज्यासह देशभरामध्ये आयारामांना पक्षाची दारे सताड उघडी ठेवल्यामुळे भाजमध्ये इनकमींग जोरात आहे. इनकमींग फ्री या पक्षनेतृत्वाच्या धोरणामुळे अनेक हैशे-नवशे-गवशे भाजमध्ये प्रवेशकर्ते झाले खरे. पण, त्याचा परिणाम मूळ कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी वाढण्यात होत आहे. धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी स्पष्टपणे उफाळून आल्याचे पाहायला मिळते आहे. 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणणाऱ्या भाजपमध्ये 'भाजप विरुद्ध स्वाभिमानी' भाजप असा 'आतले विरद्ध बाहेरचे' सामना रंगला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा सामना भाजपसाठी केवळ एका शहराचा विषय राहिला नाही. तर, आमदार अनिल गोटे यांच्यामुळे तो राज्यस्तरावरचाही झाला आहे. पक्षनेतृत्व यावर काय तोडगा काढणार यावर अनेक कार्यकर्त्यांचे भविष्य ठरणार आहे.
धुळे महापालिका निवडणुकीत दिवळीच्या आगोदरपासून राजकीय वर्तुळात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी सत्तासंघर्ष टोकाला पोहोचला. पण, या सगळ्यात आनिल गोटे यांनी एक मोठा बॉम्ब फोडला. ज्याचे पडसाद केवळ धुळे शहरच नव्हे तर, राज्यातील भाजपच्या वर्तुळात अधिक तीव्रतेने उमटले. निवडणुकीच्या तोंडावर धुळे शहरातील प्रचंड गटबाजी पुढे आली. यात नेत्यांचा श्रेयवाद हे कारण प्रमुख असले तरी, मूळ पक्षकार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत इतर पक्षांतील आयारामांना तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमिच्या मंडळींना भाजप नेतृत्वाने दिलेला पक्षप्रेवश हेही आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पक्षाने मुळ कार्यकर्त्यांना डावलून इतर पक्षांतील आयारामांना प्रवेशे देऊ नये असा अनेक भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या या भावनेला आमदार अनिल गोटे यांनी तोंड फोडले. अनिल गोटे गोटे हे भाजपचे आमदार असून, भाजपतील इनकमींगला त्यांचा सक्त विरोध आहे. इतर पक्षांतून उमेदवार, नेते आयात करुन किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमिच्या लोकांना तिकीट देऊन निवडणून आणण्यापेक्षा भाजपच्या मुळच्या कार्यकर्त्याला आपण ताकद देऊ. त्याला मोठे करुन आणि पक्ष वाढवू अशी भूमिका अनिल गोटे व्यक्त करतात.
दरम्यान, अनिल गोटेंच्या भूमिकेकडे भाजप नेतृत्व कसे पाहते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, अनिल गोटे यांनी मंगळवारी एक सात पानांचे पत्रच जाहीर करुन आपली भूमिका मांडली. जाहीर सभा घेऊन धुळ्याचा महापौर मीच जाहीर करणार असेही सांगितले. आमदार गोटे हे इतक्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी गरज पडल्यास थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचाही धमकीवजा इशारा दिला. तसेच, भाजपकडून धुळ्याचे प्रभारी म्हणून नेमलेले मंत्री गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्य कार्यक्रमात आमदार गोटे आणि समर्थकांनी जोरदार राडा केला. त्यावरुन धुळे भाजपामध्ये सर्वच काही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले. त्यामुळे धुळ्यातील हा संघर्ष केवळ एका शहर किंवा प्रदेशापुरता मर्यादीत नाही. संपूर्ण राज्यातील भाजपमध्ये काहीशी अशीच स्थिती असल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे भाजप नेतृत्व या संघर्षाकडे कसे पाहते यावर भाजपच्या यशापयशावर त्याचा परिणाम होणार हे नक्की. (हेही वाचा, धुळे: भाजपवासी होऊन वाल्याचा वाल्मिकी झालेल्या गुंडाला अभय; इतर ३२ गुंडांवर मात्र हद्दपारीचा बडगा)
धुळ्यात भाजपेत्तर पक्षांकडून 'वेट अँड वॉच'
धुळ्यात आता राजकीय घडमोडींनी वेग घेतला असला तरी, भाजपतील सत्तसंघर्ष वगळता इतर राजकीय पक्षांत मात्र काहीशी शांतता आहे. या पक्षांनी सध्या तरी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. असे असले तरी, भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि स्वाभिमानी भाजपा असा चौरंगी सामना रगणार असे दिसते. शिवसेनेने आपले पत्ते न खोलता उत्सुकता कायम ठेवली आहे. खासदार संजय राऊत आणि के. पी. नाईक यांच्यावर धुळे निवडणुकीची सूत्रे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नेमके काय सुरु आहे हे प्रत्यक्ष उमेदवार यादी जाहीर झाल्यावर कळणार आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादीतही फारशी वेगळी स्थिती नाही. दरम्यान, बहुजन महासंघ, रिपाईचेही चित्र अद्याप स्पष्ट नाही.
धुळे महानगर पालिका निवडणूक कार्यक्रम
एकूण प्रभाग - १९
मतदान दिनांक - ९ डिसेंबर
एकूण मतदार - ३ लाख २९ हजार ५६९
पुरुष मतदार - १ लाख ७४ हजार ६९६
महिला मतदार - १ लाख ५४ हजार ८६०
धुळे महानगर पालिकेसाठी तब्बल ४५० मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर ६ तसेच १० टक्के राखीव म्हणून एकूण २ हजार ७४५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)