Dharmarao Baba Atram On Jayant Patil: धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा, 'जयंत पाटील अजित पवार गटाच्या संपर्कात'

कोणता आमदार, खासदार आणि नेता कोणत्या गटात याची दररोज चर्चा, दावे-प्रतिदावे आणि खुलासे सुरु आहेत.

Dharmarao Baba Atram | (File Image)

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सुरु झालेले कवित्व न्यायालयाच्या दारी पोहोचले तरीही थांबायचे नाव घेत नाही. कोणता आमदार, खासदार आणि नेता कोणत्या गटात याची दररोज चर्चा, दावे-प्रतिदावे आणि खुलासे सुरु आहेत. आताही राज्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बाबत दावा करत चर्चेला नव्याने तोंड फोडले आहे. त्यांनी दावा केला आहे की, पाटील हे आगामी काळात अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाच्या संपर्कात आहेत. लवकरच अजितदादा गटातील समर्थक आमदारांची संख्या 53 वर पोहोचणार आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, शरद पवार गटातील नेते दावा करत आहेत की, अजित पवार गटातील तब्बल 15 आमदार हे आमच्यासोबत येणार. पण त्यांच्या माहितीसाठी असे की, हा दावा करणारे खुद्द जयंत पाटील हेच मुळात आमच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. लवकरच ते आमच्यासोबत येतील. अजितदादा गटातील आमदारांमध्यो कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. आमचे नेते (अजित पवार) आमदारांची नियमीत बैठक घेतात. त्यांचे प्रश्न, समस्या आणि मतदारसंघातील अडचयमी जाणून घेतात. पूर्वी हे कधीच होत नव्हते, म्हणूनच आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता अजित पवार गटात आल्यानंतर सर्व आमदार खूश आहेत.

गडचिरोली मतदारसंघावर आत्राम यांचा दावा

दरम्यान, लोकसभेसाठी आम्ही मिशन 45 ची तयारी सुरु केली आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम सुरु आहे. आमच्या आमदारांचाही आकडा लवकरच 53 वर पोहोचणार आहे. अशा वेळी गडचिरोली मदतारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे. त्यासाठी आवश्यक तयारीसुदधा मी केली आहे, असा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

आत्राम यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तळात उलटसुलट चर्चा सुरु झाली असली तरी, जयंत पाटील यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय येते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शरद पवार आज दिल्लीला आहेत. तेथे ते पक्षाच्या नेत्यांची एक बैठक घेणार आहेत. या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.