देवेंद्र फडणवीस 5 नोव्हेंबरला घेणार का मुख्यमंत्री पदाची शपथ? वानखेडेवर शपथविधी होण्याची शक्यता
यात विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पुढील मुख्यमंत्री पदासाठीची तयारी सुद्धा सुरु केली आहे.
शिवसेना आणि भाजप पक्षांमध्ये सध्या मतभेद सुरु असले तरी दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. यात विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पुढील मुख्यमंत्री पदासाठीची तयारी सुद्धा सुरु केली आहे.
सकाळ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे येत्या 5 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतील. आणि त्यांनी त्या दृष्टीने हालचाल करायला देखील सुरुवात केली आहे. हा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची माहिती सकाळने दिली आहे. तसेच हा शपथविधी समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांना देण्यात आली आहे.
मात्र भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेकडून अद्यापही कोणतीच सकारात्मक हालचाल सत्ता स्थापनेच्या दिशेने दिसत नाही, कारण शिवसेना 50-50 या फॉर्म्युलावर अजूनही असून बसली आहे. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्री पद आपल्याकडे हवे असले तरी भाजप मात्र त्यासाठी तयार नाही.
या सर्वाचे परिणाम म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट. त्यामुळे शिवसेना भाजप हे तर दाखवू इच्छित नाही ना कि त्यांच्याकडे इअतरही पर्याय आहेत असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.