Demolition of Sai Resort in Dapoli: अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार; मुंबई हायकोर्टाचे आदेश
नंतर त्यांनी हे रिसॉर्ट मित्र सदानंद कदम यांना विकले. बांधकामामध्ये अनियमितता असल्याचं सांगत मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते
दापोली (Dapoli) मधील साई रिसॉर्ट (Sai Resort) अनधिकृत असल्याचं निश्चित झाल्यानंतर आता तो पाडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहेत. येत्या 4 आठवड्यात रिसॉर्ट पाडण्याचे आदेश अनिल परब (Anil Parab) आणि सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना देण्यात आले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 2020 मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिल परब आणि किरीट सोमय्या एकमेकांसमोर ठाकले होते. आता अखेर या प्रकरणामध्ये कोर्टाने रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.
साई रिसॉर्ट हे आधी अनिल परब यांचे होते. नंतर त्यांनी हे रिसॉर्ट मित्र सदानंद कदम यांना विकले. बांधकामामध्ये अनियमितता असल्याचं सांगत मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. नंतर राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्त्र समिती स्थापन करून त्यांच्या कडून पाहणी केली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे कोर्टात गेले.
सदानंद कदम यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती. दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. तपास यंत्रणेने या संदर्भात त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून त्याची चौकशीही केली आहे. वास्तविक भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. फसवणूक करून दापोली, रत्नागिरी येथे आलिशान रिसॉर्ट बांधल्याचे त्याने सांगितले होते. या संदर्भात दापोली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सरकारची फसवणूक आणि नुकसान केल्याप्रकरणी एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.