Maharashtra Floods: पुणे विभागात पुरामुळे 54 लोकांचा मृत्यू; 8000 पेक्षा जास्त जनावरे ठार तर 19,702 घरे नष्ट

या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 54 वर पोहचली आहे, तर अजूनही 4 नागरिक गायब आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या ठिकाणाचा पूर (Flood) ओसरायला सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांसाठी सुरक्षित ठिकाणी छावण्या उभा केल्या आहेत. जेवणाची, जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आली आहे. चहूबाजूंनी मदतीचा ओघ सुरु आहे. मुसळधार पाऊस त्यात धरणातून सोडण्यात येणारे पाणी यांमुळे तब्बल आठवडाभर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती होती. या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 54 वर पोहचली आहे, तर अजूनही 4 नागरिक गायब आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे -

पुरामुळे पुणे विभागात तब्बल 54 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. 8000 पेक्षा जास्त जनावरे ठार झाले व एकूण 19,702 घरे नष्ट झाली आहेत. ही आकडेवारी पाहता पुरामुळे किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याचा अंदाज येतो. या जलप्रलयाचा सर्वात जास्त फटका बसला तो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना. सांगलीमध्ये तर पुराने 2005 सालचा रेकॉर्ड मोडला होता. दुसरीकडे कोल्हापूरच्या चहूबाजूंनी पाण्याचा वेढा होता. अशा परिस्थिती अनेक गावे पाण्याखाली गेली होती. आता या नागरिकांच्या पुनर्वसनाचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे.  (हेही वाचा: कोल्हापूर, सातारा मध्ये पूर ओसरायला सुरूवात; देशात महापूराने घेतले 97 बळी)

या सर्वांमध्ये भर म्हणजे ब्रम्हनाळ येथे पुरग्रस्तांच्या मदतीला गेलेली बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांना जीव गमवावा लागला होता. दरम्यान पूरग्रस्त लोकांसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये सर्वात कौतुकास्पद ठरत आहे ती मराठी चित्रपट सृष्टीमधील लोकांनी केलेली मदत. ही मदत जीवनावश्यक वस्तूंच्या रूपाने पूरग्रस्त भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच सरकार व इतर सामाजिक संस्था पूरग्रस्त नागरिकांना घरे बांधून देणार आहेत.