Devendra Fadnavis & Ashok Chavan: कथीत भेटीचे देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांच्याकडून खंडण; राजकीय वर्तुळात मात्र उलटसूलट चर्चा

या भेटीचे वृत्त फेटाळून लावत अशा प्रकारे कोणतीही भेट झाली नसल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कथीत भेटीच्या वृत्तावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असला तरी राजकीय वर्तुळात मात्र ही चर्चा वेगवेगळ्या अर्थाने सुरुच आहे.

Devendra Fadnavis & Ashok Chavan | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेनेपाठोपाठ (Shiv Sena) काँग्रेस (Congress) पक्षालाही बंडाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण या दोन्ही नेत्यांनी या कथीत राजकीय भेटीबाबत कानावर हात ठेवले आहेत. या भेटीचे वृत्त फेटाळून लावत अशा प्रकारे कोणतीही भेट झाली नसल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कथीत भेटीच्या वृत्तावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असला तरी राजकीय वर्तुळात मात्र ही चर्चा वेगवेगळ्या अर्थाने सुरुच आहे.

देवेंद्र फडणीस यांनी या भेटीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अशोक चव्हाण यांच्यासोबत अशी कोणतीही भेट झाली नाही. मी एका ठिकाणी गणपतीसाठी गेलो होतो. योगायोगाने त्याच वेळी तेसुद्धा याच ठिकाणी भेटीला आले होते. ते गणपतीचे दर्शन घेऊन निघाले होते तर मी गणपती दर्शनासाठी पोहोचत होतो. त्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी आलो असलो तरी आमच्यात कोणतीही भेट मात्र झाली नाही. (हेही वाचा, Shiv Sena Dasara Melava 2022: शिवसेना दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणेच एकनाथ शिंदे गटाकडूनही बीएमसीकडे अर्ज)

अशोक चव्हाण यांनी मात्र देवेंद्र फडणीस आणि आपल्यात भेट झाली. मात्र, तो केवळ वार्तालाप होता. मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयाची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी ही भेट झाल्याचे अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मात्र, दोन्ही नेत्यांनी राजकीय अर्थाच्या भेटीबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कथीत भेटीच्या वृत्तावर भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल आपल्याला माहिती नाही. परंतू, पाठिमागील काही काळापासून काँग्रेस पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. प्रामुख्याने ही अस्वस्थता केंद्रीय नेतृत्वाबाबत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्तेही पक्षांतराच्या विचारात आहेत. अशोक चव्हाण यांच्या मनात काय आहे याबाबत आपल्याला काही माहिती नाही. परंतू, त्यांच्या प्रस्ताव आल्यास भाजप त्याचा जरुर विचार करेल, असे सूचक वक्तव्य राधाकृष्ण विखेपाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळेही राजकीय वर्तुळातील चर्चेला वेगळीच हावा मिळाली आहे.