Datta Dalvi Bail: दत्ता दळवी यांना मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर

दत्ता दळवी यांच्यावर 28 नोव्हेंबरच्या रात्री 11 वाजता FIR दाखल करून दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता ते मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले असताना अटक केली होती.

Datta Dalvi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi)  यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आज मुलुंड न्यायालयाने (Mulund Court) त्यांना 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. थोड्याच वेळात त्यांची तुरूंगातून सुटका होणार आहे. दत्ता दळवी यांच्या सुटकेनंतर उद्या ते 'मातोश्री' वर जातील अशी माहिती आमदार सुनील राऊत यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. सुनील राऊत आज कार्यकर्त्यांसह कोर्ट परिसरामध्ये उपस्थित होते.

वकील  संदीप सिंह यांनी दत्ता दळवी यांची बाजू कोर्टात लढली आहे. त्यांनी मीडीयाला दिलेल्या माहितीनुसार, दत्ता दळवी यांच्यावर 28 नोव्हेंबरच्या रात्री 11 वाजता FIR दाखल करून दुसर्‍या दिवशी सकाळी 7 वाजता ते मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले असताना अटक केली होती. आता त्यांना पोलिस चौकशी संपेपर्यंत दर सोमवारी पोलिस स्टेशनला येऊन सहकार्य करावं असं म्हटलं आहे. (हेही वाचा, Saamana Editorial on CM Eknath Shinde: 'गद्दार हृदयसम्राटांकडे भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'सामना'तून प्रहार).

पहा काय होतं प्रकरण

शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून दत्ता दळवींना अटक झाली होती. मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल दळवी यांनी जाहीर सभेत आक्षेपार्ह, अर्वाच्च आणि अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ केल्याचा आरोप होता. भूषण पलांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता.