Cyclone Nisarga: आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना पाळा, घराबाहेर पडणे टाळा; पालकमंत्री छनग भुजबळ यांचे नाशिककरांना अवाहन

जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, गारपीटीच्या रुपात वादळाचा फटका बसू शकतो.

Chhagan Bhujbal | (File Photo)

निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) संकटाचा फटका केवळ समुद्र किनारपट्टीच नव्हे तर राज्यातील इतरही भागांना बसू शकतो. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना पाळत, घराबाहेर पडणे टाळायला हवे, असे अवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना केले आहे. छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister Chhagan Bhujbal) आहेत. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री या नात्याने नाशिकच्या जनतेलाही अवाहन केले आहे. तसेच, जिल्ह्यातील काही भागात नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी हवामान विभागाचा दाखला देत म्हणले आहे की, निसर्ग चक्रीवादळ हे 3 किंवा 4 जूनला नाशिक जिल्ह्यात दाखल होऊ शकतो. जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, गारपीटीच्या रुपात वादळाचा फटका बसू शकतो. अशाकाळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच, आपत्ती विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. आपल्या घरीच सुरक्षित राहावे. शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. (हेही वाचा, Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळ जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे- उपमुख्यमंत्री अजित पवार )

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट काळात जे नागरिक Home Quarantine आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हालवावे. अशा सूचनाही भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत. याशिवाय जर कोणाला मदत, अथवा माहिती हवी असेल तर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा असे आवाहन पालकमंत्री म्हणून भुजबळ यांनी नाशिकच्या जनतेला केले आहे.