Cyber Fraud in Thane: केवायसी अपडेटच्या नावाखाली, वृद्धाला 7.38 लाख रुपयांचा गंडा; ठाणे येथील घटना
सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला केवायसी अपडेट (KYC Update) न मिळाल्याने तुमचे बँक खाते ब्लॉक झाल्याचे सांगून हूल दिली.
केवायसी अपडेट (KYC Update) करण्याच्या नावाखाली 72 वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तब्बल 7.38 लाख रुपयांचा गंडा (Cyber Fraud in Thane) बसला आहे. सायबर गुन्हेगारांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला केवायसी अपडेट (KYC Update) न मिळाल्याने तुमचे बँक खाते ब्लॉक झाल्याचे सांगून हूल दिली. त्यांनी वृद्धाकडे गोपनीय तपशील मागितला. जो मिळताच या वृद्ध माजी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून 7.38 लाख रुपयांची रक्कम परस्पर वळती करण्यात आली. ठाणे जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे.
ठाणे पोलिसांनी सांगितले की, तक्रारदाराला 4 फेब्रुवारी रोजी एक कॉल फोन कॉल आला. कॉलरने त्याला सांगितले की त्याचे बँक खाते ब्लॉक केले जात आहे कारण त्याने अनिवार्य केवायसी (नो युवर कस्टमर) कागदपत्रे अपडेट केली नाहीत. तक्रारदार असलेल्या पीडित व्यक्तीला तंत्रज्ञानाची जाण नव्हती. त्याने फोनवर गुप्त एटीएम पासवर्ड आणि बचत खात्यांचे तपशील यांसारखे आर्थिक तपशील कॉलरला पूरवले. हे वर्तन तक्रारदाराने कॉलरने दिलेल्या सूचनांचे पालन करुन केले. (हेही वाचा,Cryptocurrency Fraud: नागपुरात क्रिप्टोकरन्सीच्या नावावर 2000 लोकांची तब्बल 40 कोटींची फसवणूक; 11 लोकांना अटक )
बँक खात्याचे तपशील प्राप्त होताच गुन्हेगारांनी पीडित तक्रारदार पुरुष आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यांमधून पैसे काढले. जी या दोघांची मासिक पेन्शन आणि सेवानिवृत्ती बचत होती. डेबिट झालेली रक्कम नंतर मुदत ठेवीमध्ये गुंतवली होती असेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66C आणि 66D अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.