Cyber Crimes: 'सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर बँकेचे व्यवहार करू नये'; मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सायबर गुन्ह्यांविरूद्ध केले सावध
एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2,084 हून अधिक घटनांमध्ये फसवणूकीचा हेतू होता, 154 लैंगिक शोषण होते तर 256 घटनांमध्ये इतर काही हेतू होते
मुंबईचे पोलिस आयुक्त परम बीर सिंह (Param Bir Singh) यांनी लोकांना सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर (Public Network) बँक व्यवहार करू नये, असे आवाहन करत सायबर गुन्ह्यांविरूद्ध (Cyber Crimes) सावध केले आहे. ट्विटरवर सिंह यांनी लिहिले आहे की, 'सार्वजनिक नेटवर्कवर तुमची वैयक्तिक माहिती सहजपणे मिळवता येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर बँकिंग माहिती, घराचा पत्ता इत्यादीसारख्या वैयक्तिक ओळख दाखवतील अशा गोष्टी नमूद करू नका.' वाय-फायमुळे माहिती मिळवणे आणि आणि ऑनलाइन व्यवहार करणे सोपे झाले असले तरी ते सुरक्षित नाही. विशेषत: ऑनलाइन बँकिंगसाठी पब्लिक वाय-फाय वापरणे अजिबात सुरक्षित नाही.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार, आयटी हब बंगळुरुच्या 10,555 प्रकरणांनंतर 2,527 घटनांसह मुंबई सायबर क्राइममध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. शहरात डेबिट/क्रेडिट कार्ड फिशिंग आणि फसवणूकीचे सर्वाधिक, 978 सायबर गुन्हे घडले आहेत. त्यापैकी 248 ऑनलाईन बँकिंग घोटाळे होते. ऑनलाइन फसवणूकीची 1,150 प्रकरणे होती. बँकिंग आणि इतर कामांसाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने, सायबर क्राइममध्येही गेल्या काही वर्षांत कमालीची वाढ झाली आहे. मुंबईत 2017 मध्ये सायबर क्राइमच्या 1,362 घटना नोंदवल्या गेल्या, तर ही संख्या हळूहळू वाढून 2018 आणि 2019 मध्ये अनुक्रमे 1,482 आणि 2,527 घटना घडल्या आहेत.
गेल्या वर्षातील मुंबईतील सायबर क्राईम रेट 13.7 टक्के होता व हा शहरातील 1.84 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2,084 हून अधिक घटनांमध्ये फसवणूकीचा हेतू होता, 154 लैंगिक शोषण होते तर 256 घटनांमध्ये इतर काही हेतू होते. गेल्या वर्षी सायबरस्टॉकिंगच्या 146 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली होती आणि डेटा चोरीसंदर्भात 28 प्रकरणे नोंदविण्यात आली. एटीएम, ओटीपी आणि ऑनलाइन बँकिंगशी संबंधित फसवणूकीसह फसवणूक आणि बनावटपणाच्या संदर्भात 19 महानगरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.