Cultural Events in Maharashtra: लवकरच सुरु होऊ शकतात राज्यातील यात्रा व जत्रा; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

देशात गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू (Coronavirus) ने थैमान घातले आहे. या दरम्यान देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता व त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातील काही बाबी म्हणजे, अजूनही अनेक ठिकाणी यात्रा, जत्रा, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे

Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

देशात गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू (Coronavirus) ने थैमान घातले आहे. या दरम्यान देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता व त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातील काही बाबी म्हणजे, अजूनही अनेक ठिकाणी यात्रा, जत्रा, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. कोविड पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असल्याने हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या उपाध्यक्षा मंगला बनसोडे, सचिव शेषराव गोपाळ, उपसचिव मोहीत नारायणगांवकर, खजिनदार किरण ढवळपूरीकर, संचालक राजेश सांगवीकर, संचालक अविष्कार मुळे, संचालक मुसा इनामदार हजर होते.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य देणे तसेच तमाशा फडांना मदत करणे यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. कोविड विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी गेल्या काही काळापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील पूर्णवेळ तमाशा फड आणि हंगामी तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावे, राज्यातील तमाशा फडांना एक तासांचा अधिक वेळ वाढवून मिळावा, गाव- यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशा काही मागण्या असलेले निवेदन यावेळी उपस्थितांनी सांस्कृतिक मंत्री देशमुख यांना दिले. (हेही वाचा: कोविड-19 दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; सण साजरे करताना नियमांचे पालन करा- आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, राज्यात आज 5,108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4, 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62, 52, 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के आहे. राज्यात आज 159 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement