Coronavirus | photo used for representation Purpose |(Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) अद्याप संपलेली नसून पुढील 2 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे पुढील काळात येणार सर्व सण, उत्सव कोरोना नियमांचे पालन करुन साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज मीडियाशी बोलताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी सांगितले की, "देश अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात आहे."

लसीकरणामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते परंतु आजाराचा धोका टळत नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. देश अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात आहे. अद्याप ती संपलेली नाही. त्यामुळे सर्व आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसंच प्रत्येक सणानंतर कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता, हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे भार्गव म्हणाले. (Coronavirus: कोरोनाचा धोका टळलेला नाही, तिसऱ्या लाटेला आमंत्रित करू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन)

सप्टेंबर आणि ऑक्टोबर येणारे पुढील दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळे हे सणवार साजरे करताना कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील 41 जिल्ह्यातील आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांहून अधिक आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येपैकी एकूण 58.4 टक्के रुग्ण केरळमधून समोर आल्याचे सरकारच्या रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण असलेलं केरळ हे एकमेव राज्य आहे. तर इतर 4 राज्यांमध्ये 10,000 ते 1 लाख इतके सक्रीय रुग्ण आहेत आणि 31 राज्यांमध्ये 10,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानहून 400 निर्वासित भाारतात आले असून त्यापैकी काहीजण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यांना आयसोलेट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

आज देशात 46,164 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून एकूण रुग्णसंख्या 3,25,58,530 इतकी झाली आहे. त्यापैकी 3,33,725 सक्रीय रुग्ण आहेत. 607 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 4,36,365 वर पोहचला आहे. दरम्यान, देशाचा रिकव्हरी रेट 97.63 टक्के इतका आहे.