एकाच Covid-19 रुग्णाला दिले 14 Remdesivir इंजेक्शनचे डोस; परवानगी न घेता चालू होते उपचार, Buldhana येथील धक्कादायक प्रकार
या काळात अनेक रुग्णालयांचा खोटारडेपणा, रुग्णांची झालेली फसवणूक समोर आली आहे. शासनाने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियमावली, प्रोटोकॉल घालून दिला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. या काळात अनेक रुग्णालयांचा खोटारडेपणा, रुग्णांची झालेली फसवणूक समोर आली आहे. शासनाने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियमावली, प्रोटोकॉल घालून दिला आहे. मात्र रुग्णालयांकडून विविध मार्गांनी होणारी पिळवणूक किंवा निष्काळजीपणा अजूनही थांबायचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे एका खाजगी रुग्णालयात एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचे डोस देण्यात आले आहेत.
लाईफलाईन रुग्णालय असे त्याचे नाव असून, आता हे रुग्णालय सील करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी परवानगी न घेता कोविड-19 रुग्णांवर उपचार केल्यासंबंधी या रुग्णालयाला सील करण्याचा आदेश देण्यात आला. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जवळीलच खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालय स्थानिक प्रशासनाची आवश्यक परवानगी न घेता कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करीत होते. कोविड-19 संबंधित अनेक उपचार प्रोटोकॉलचेही उल्लंघन हॉस्पिटलने केले आहे.
यामध्ये म्हटले आहे की रुग्णालयाने एका प्रकरणात एका रुग्णाला 14 रेमडेसिवीर इंजेक्शन्स दिली. संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकार्यांकडे संपर्क साधून याबाबत तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने संपूर्ण अहवाल जिल्हाधिरी एस राममूर्ती यांच्यासमोर सादर केला. त्यांनी संपूर्ण अहवालाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लाईफलाईन रुग्णालय सील करण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा: Thane Vaccination: ठाणे महापालिका लसीकरण केंद्राचा अजब प्रकार, महिलेला दिले एकाच वेळी लसीचे तीन डोस)
दरम्यान, याआधी बुलडाण्याच्या संग्रामपूर तहसीलच्या मारोड गावात कोरोना संक्रमित रूग्णांसाठी शाळेत बांधल्या गेलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये, आठ वर्षाच्या निरागस मुलाकडून टॉयलेट साफ केल्याची घटना घडली होती. तसेच खामगाव येथे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी 11 हजार रुपये कमी पडत असल्याने, रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र काढून घेतले होते.