COVID-19: गुढी पाडवा शोभायात्रांना कोरोना व्हायरस मुळे यंदा ब्रेक; डोंबिवली, ठाणे, मधील स्वागतयात्रा रद्द

गुढीपाडवा (Gudhi Padwa) निमित्त हिंदू नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या स्तरावर शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते, यापैकी ठाणे शहर आणि डोंबिवली मधील शोभायात्रा या मागील 21 वर्षांपासून सलग आयोजित करण्यात येतात, मात्र यंदा या परंपरेला कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) जागतिक संकटामुळे ब्रेक लागणार आहे.

Gudhi Padwa Shobha Yatra Canceeled Due To COVID-19 (Photo Credits: File Image)

गुढी पाडवा (Gudhi Padwa) निमित्त हिंदू नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या स्तरावर शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते, यापैकी ठाणे शहर आणि डोंबिवली मधील शोभायात्रा या मागील 21 वर्षांपासून सलग आयोजित करण्यात येतात, मात्र यंदा या परंपरेला कोरोना व्हायरसच्या (Corona Virus)  जागतिक संकटामुळे ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहान करण्यात आले असता, आता ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी गुढी पाडवा स्वागत यात्रा यंदासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील स्वागत यात्रा आयोजकांची बैठक बोलावली होती ज्यात एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे या शोभायात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणाईच्या आणि आयोजकांच्या उत्साहावर किंचित विरजण पडले आहे, मात्र हे कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वांनी सहाय्याचा सुरु धरला आहे. डोंबिवली मधील शोभायात्रा आयोजकांनी यंदाच्या यात्रेच्या आयोजनाचा खर्च वाचवून तो राज्यातील कोरोना हटवण्यासाठी सुरु असणाऱ्या उपाय योजनांसाठी देणार असल्याची घोषणा केली.

दुसरीकडे उल्हासनगर येथील सिंधी समाजाची चेटीचंद यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी या बैठकीमध्ये घेतला असून त्याचबरोबर नवी मुंबईतील लेजेंड क्रिकेट सामना पाहण्यासाठी काढलेल्या तिकीटाचे पैसे संबंधितांना परत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी बैठकीत दिले आहेत.

दरम्यान, राज्यभरात कोरोनाने संसर्गित लोकांची संख्या 20 च्या घरात आहे, ठाण्यात सुद्धा कोरोनाचा एक रुग्ण आढळला. जगभरात या व्हायरसने घेतलेल्या बळींचा आकडा पाहता यापासून वाचण्यासाठी शक्य त्या सर्व उपाय योजना करण्याकडे भर दिला जात आहे, याच पार्श्वभूमीवरून राज्यातील सर्वात मोठमोठे सोहळे सुद्धा पुढे ढकलण्यात आले आहेत. यानुसार 100 वे महाराष्ट्रव्यापी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन तसेच आयपीएल च्या तारखा सुद्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.