COVID 19 In Maharashtra: मुंबई, पुण्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढले; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर
या व्हेरिएंटमध्ये संसर्ग पसरवण्याचा वेग अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईसह मेट्रो शहरांमध्ये मागील काही दिवसांत मंदावलेला कोरोना संसर्गाचा वेग आता पुन्हा वाढला आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) कोविड 19 टेस्टिंगचेही (COVID19 Tests) प्रमाण वाढवण्यात आले आहे. सध्या कोविड 19 पॉझिटिव्हिटी रेट 6% झाला आहे. बीएमसी कडून कोविड 19 च्या चाचण्यांसाठी लॅब्स देखील पूर्ण कार्यक्षमतेचे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, ठाणे शहराचा काही भाग येथे कोविड 19 रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज कोविड 19 रूग्णांची एकूण संख्या 3475 आहे त्यापैकी 2500 रूग्ण मुंबई मध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या 2500 रूग्णांमध्ये कुणीही हॉस्पिटल मध्ये दाखल नाही त्यामुळे सध्या तरी चिंतेची बाब नाही, परंतू काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. नक्की वाचा: महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन? Covid-19 रुग्णांमध्ये वाढ, हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण 231 टक्क्यांनी वाढले .
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.4 चे चार आणि BA.5चे तीन रूग्ण समोर आले आहेत. या व्हेरिएंटमध्ये संसर्ग पसरवण्याचा वेग अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर येऊन काम करत आहेत.
हॉस्पिटल्स आणि कोविड जम्बो सेंटर्स पुन्हा सज्ज ठेवण्यासोबतच बीएमसीच्या हद्दीमध्ये लसीकरणावरही भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 12-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोसच्या लाभार्थ्यांनाही डोस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता येत्या काही दिवसांत मान्सून देखील दाखल होणार असल्याने या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.