Covid-19: नालासोपारा येथे कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे 38 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात थैमान घातला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच नालासोपारा (Nalasopara) येथे कोरोनाची लागण झाल्यामुळे 38 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल दिसून आला नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांत झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश अधिक लक्ष देत आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच नालासपोरा परिसरातील एका गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. वसई- विरार महापालिकेने याची माहिती दिली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत हजारो लोकांचा जीव घेतला आहे. तर लाखो लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मतोश्री जवळील परिसर सील करण्यात आलेले वृत्त चुकीचे; मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती
एएनआयचे ट्वीट-
दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 704 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4281 वर पोहचली आहे. यातील 3851 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 318 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.