गेले एक वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. आता कुठे कोरोनाच्या लसीमुळे (Corona Vaccination) या विषाणूवर मात करण्याची आशा निर्माण झाली आहे. आजपासून भारतामध्ये व्यापकरित्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या लसीकरणात भाग घेण्यासाठी CoWIN App वर नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र आता राज्यात CoWIN App वर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू लसीकरण 18 जानेवारीपर्यंत तात्पुरते स्थगित केले गेले आहे. राज्य आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे 18,338 हून अधिक (सुमारे 64 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
COVID19 vaccination temporarily suspended till 18th January in the entire state of Maharashtra due to technical issues with CoWIN App: State Health Department
— ANI (@ANI) January 16, 2021
राज्यात सकाळी 11 वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले. (हेही वाचा: Coronavirus Vaccine Price: महाराष्ट्रात कोरोना लशीची किंमत किती असेल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर)
पहिल्या दिवसाच्या लसीकरणानंतर ओडिशा सरकारने म्हटले आहे की, रविवारी राज्यात कोणालाही लस दिली जाणार नाही. सरकारने सांगितले आहे की, ते एक दिवस लस घेणाऱ्या लोकांच्या स्थितीवर लक्ष ठेवतील. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पीके महापात्र यांनी ही माहिती दिली. दरम्यान, देशात पहिल्याच दिवशी 1 लाख 91 हजार 181 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. यासाठी देशभरात 3351 लसीकरण केंद्रे उभारली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणानंतर आतापर्यंत रुग्णालयात दाखल होण्याचे कोणतेही प्रकरण समोर आले नाही.