Coronavirus: कोरोना व्हायरस संकटात कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण: महाराष्ट्र सरकार

या आव्हानाचा सामना करण्यासाठी गरज पडल्यास अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींची मदत घेतली जाणार आहे.

Hasan Mushrif | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस संकटात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी (Anganwadi) आणि ग्रामपंचायत (Gram Panchayat) कर्मचारी आणि आशा (Asha Workers) कार्यकर्तींना 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच, एक हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली आहे. राज्यासमोर कोरोना व्हायरस संकटाचे मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी गरज पडल्यास अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींची मदत घेतली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या एका भाषणात म्हटले होते की, राज्यासमोर कोरोना व्हायरस संकटाचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान नियंत्रणात ठेवण्याचा राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, हे आव्हान जर का वाढले आणि राज्याती आरोग्य यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण निर्माण झाला. तर, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींची मदत घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने त्यांना आवश्यक असे प्रशिक्षण देण्याचे काम सुरु असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या वेळी सांगितले होते. (हेही वाचा, Coronavirus च्या उद्रेकाने महाराष्ट्र हादरला; एका दिवसात तब्बल 72 जणांना कोरोना विषाणूची लागण)

राज्यासमोर कोरोना व्हायरसचे संकट वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यात आज आणखी नवे कोरोना बाधित 72 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 59 मुंबई येथील आहेत. तर अगमदनगर 3, पुणे 2, ठाणे, कल्याण-डोंबिवरी, नवी मुंबई आणि वसई, विरार येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या आता 302 इतकी झाली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी, उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. आतापर्यंत मुंबई व ठाणे परिसर 14, पुणे 16, नागपूर 04, अहमदनगर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे एकूण 39 रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. तर कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला राज्यातील संख्या 10 इतकी झाली आहे.