Coronavirus: राजेश टोपे यांचा इशारा 'तर राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो'
ग्रामीण भागात उपकेंद्रांपर्यंत लसीकरण करता यावे, नागरिकांना सुलभता व्हावी यासाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील वाढते कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंध याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज (22 मार्च) पत्रकार परिषदेत माहिती दिली. राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात सध्या प्रतिदिन सुमारे तीन लाख नागरिकांना कोरोना लसीकरण केले जात आहे. कोरोणा लसीकरणाचा कार्यक्रम येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती स्थिती पाहता प्रतिबंध म्हणून काही ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा लागू करावा लागू शकतो, असा इशाराही टोपे यांनी या वेळी दिला. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त केल्याचे टोपे यांनी सांगितले.
कोरोना लसीकरण कार्यक्रमास गती मिळावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, असे सांगत राजेश टोपे म्हणाले, कोरोना लसीकरणासाठी खासगी ठिकाणं वाढविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात उपकेंद्रांपर्यंत लसीकरण करता यावे, नागरिकांना सुलभता व्हावी यासाठी लसीकरणाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे या पुढे कोरोना लसीकरणासाठी जेवढेही अर्ज येतील ते सर्व अर्ज पुढे पाठवून त्याबाबत मंजूरी घेतली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली. कोरोना लसीकरणावर महाराष्ट्राचे विशेष लक्ष असल्याचेही टोपे म्हणाले.
दरम्यान, कोरोना संसर्ग कसा टाळता येईल यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मास्क वापरणे, हात धुणे यासह सोशल डीस्टन्सींग पाळणे यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या मंडळींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे त्यांनी स्वत:वर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. काही लोक सोसायट्यांमध्ये राहतात. अशा वेळी सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणातील लोकांवर लक्ष ठेवावे. आमच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीही लक्ष ठेऊन असतात, असे राजेश टोपे म्हणाले.