Coronavirus: पुणे येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दवाखाने, औषध दुकाने उघडी ठेवण्याचे आरोग्य खात्याकडून आवाहन
देशात कोरोनाबाधितांचा आकडा 500 पेक्षा अधिक आणि महाराष्ट्रात 107 वर गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गांभीर्याने नागरिकांनी घेणे महत्वाचे आहे.
देशभरात वाढता कोरोना व्हायरसचा धोका पाहता नागरिकांना घरीच थांबवण्याचे आवाहन केले जात आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 500 पेक्षा अधिक आणि महाराष्ट्रात 107 वर गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे संकट अधिक गांभीर्याने नागरिकांनी घेणे महत्वाचे आहे. तर विविध राज्यात लॉकडाउन सांगितले असले तरीही नागरिक अनावश्यक कारणे सांगून रस्त्यावर उतरत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सुविधा सुरु ठेवण्यात येणार असल्याचे ही सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. तर पुण्यात कोरोना व्हायरसचे 19 आणि पिंपरी-चिंचवड येथे 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तेथे पूर्णपणे बंद पाळला जात आहे. परंतु पुण्यात दवाखाने आणि औषध दुकाने उघडी ठेवा असे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एक ट्वीट केले आहे. त्यानुसार त्यांनी ट्वीट मध्ये असे म्हटले आहे की, अनेक ठिकाणी ओपीडी बंद ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मात्र कोरोनाच्या काळात सेवा आणि तातडीची वैद्यकिय सेवा जनतेला मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणीही ओपीडी किंवा अन्य आरोग्य सेवा बंद ठेऊ नयेत. ऐवढेच नाही तर दवाखाने आणि औषध दुकाने सुद्धा नागरिकांच्या सोईसाठी सुरु ठेवण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट गंभीर असले तरीही सरकार खंबीर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)
दुसऱ्या बाजूला पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वाहनांना पुरवण्यात येणारा इंधन पुरवठा थांबवा अशा सुचना दिल्या आहेत. फक्त आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल पंपवर इंधन भरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.