Coronavirus Outbreak In Maharashtra: महाराष्ट्रात मेडिकल स्टोअर्स, रेल्वे, बस सेवा ते मॉल, मंदिरं नेमकं काय राहणार सुरू आणि बंद? घ्या जाणून

परिणामी काही सेवा खंडीत झाल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना नेमक्या कोणत्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आणि काय बंद राहणार याबाबत संभ्रम आहे.

Coronavirus In Maharashtra | Photo Credits: File Photo

जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना बघता बघता भारतामध्ये दाखल झाला आणि आता त्याचं महाराष्ट्र राज्यात थैमान सुरू आहे. आज (17 मार्च) सकाळ पर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 39 वर पोहचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्यात असल्याने आता त्याला रोखण्यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा थुंकी, खोकला आणि शिंक यांच्या शिंतोड्यातून होत असल्याने जगभरात लोकांचा एकमेकांशी थेट संपर्क टाळण्यासाठी आवाहन केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे,नागपूर  यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये गर्दीची अनेक ठिकाणं आहेत. यामधून कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. परिणामी काही सेवा खंडीत झाल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना नेमक्या कोणत्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आणि काय बंद राहणार याबाबत संभ्रम आहे. मग जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या आदर्श नियमावली नुसार राज्यात नेमक्या कोणकोणत्या सेवा सुरू राहणार आणि कोणत्या तात्पुरता बंद राहणार ?

महाराष्ट्रात सुरू राहणार्‍या सेवा कोणत्या ?

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा

महाराष्ट्रात सार्‍या वैद्यकीय सोयी सुविधा देणार्‍या संस्था सुरू राहतील यामध्ये खाजगी, सरकारी हॉस्पिटल्स, लॅब्स, मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश आहे. Coronavirus: हॅन्ड सॅनिटायझर, मास्क मिळत नसतील तर 'या' क्रमांकावर करा तक्रार; केंद्र सरकार करणार कडक कारवाई.

किराणा माल दुकानं

मॉल्स बंद असले किंवा जमावबंदीचे आदेश असले तरीही मुंबई, पुणे शहरामध्ये नेहमीच्या लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा करणारी सारी किराणा माल दुकानं सुरू राहणार आहेत. यामध्ये दूध, भाज्या, फळं, स्वयंपाकघरातील वस्तू यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकरण अधिक प्रमाणात सामान भरून ठेवण्याची आवश्यकता नाही.

बस आणि रेल्वे सेवा

राज्यात बस, रेल्वे, विमान सेवा या वाहतूकीच्या अत्यावश्यक सेवांपैकी एक आहेत. त्यामुळे मुंबईची लाइफ लाईन लोकल, मेट्रो, मोनो रेल किंवा बस सेवा अद्याप बंद केलेल्या नाही. मात्र लांब पल्ल्यांच्या रेल्वे आणि विमान सेवांवर काही बंधनं आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम चालवण्याचे BMC चे खाजगी कंपन्यांना आदेश.  

10,12 वी बोर्ड परीक्षा

शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकानुसार 10,12 च्या परीक्षा नियमित पार पडतील.

देवस्थानं

चर्च, मस्जिद, देऊळ यासारख्या धार्मिक स्थळांवर एकाच वेळी अनेक भाविक गर्दी करतात त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन स्वतःहून धार्मिक स्थळांच्या प्रशासनाकडून करण्यात यावं असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार सिद्धीविनायक मंदिर, तुळजापूर मंदिर, श्रीमंत दगडूशेठ मंदिर बंद राहील. शिर्डी साईबाबा आणि कोल्हापूर मधील अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी खुलेच राहणार, Coronavirus चा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून घालण्यात आल्या 'ह्या' अटी.

बॅंक व्यवहार 

कोरोनाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करण्याकडे अधिक भर द्या असा सल्ला दिला आहे. दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी कामकाजाच्या वेळेमध्ये बॅंका सुरू राहतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी Digital Payment चा वापर करण्याचे RBI चे आवाहन; NEFT, IMPS, UPI सेवा चोवीस तास सुरु.

उच्च न्यायालयाचे व्यवहार  

उच्च न्यायालयामध्ये केवळ तातडीच्या सुनावणींंना प्राधान्य दिले जातील. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 17 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत 12-2 या वेळेत न्यायालयीन कामकाज होईल.  तर रजिस्ट्री कार्यालय 11.30 ते 3.30 पर्यंत मर्यादीत कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू राहील.

महाराष्ट्रात बंद राहणार्‍या सेवा कोणत्या ?

आंतरराष्ट्रीय पर्यटन

महाराष्ट्रातून नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला कारण अनेक देशांनी परदेशी पर्यटकांना व्हिसा नाकारला आहे. त्यामुळे येत्या 15 एप्रिल पर्यंत परदेशी सहली स्थगित करण्यात आल्या आहेत.

अम्युझमेंट पार्क

मुंबईतील एस्सेल वर्ड, वॉटर किंग्डम यासारखी अम्युझमेंट पार्क्स बंद करण्यात आली आहेत. दरम्यान मुंबईतील जिजामाता उद्यान देखील बंद राहणार आहे. 31 मार्च पर्यंत राज्यातील व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य बंद राहतील.

शाळा, महाविद्यालयं

महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी भागात शाळा, कॉलेज 31 मार्च पर्यंत बंद राहतील. यामध्ये आंगणवाडीचा देखील समावेश आहे. तसेच विद्यपीठांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात येतील.

नाट्यगृह, सिनेमागृह आणि शुटिंग

राज्यात 31 मार्च पर्यंत नाट्यगृह, सिनेमागृह बंद राहतील तसेच वेबसीरीज,चित्रपट यांचं शूटींग देखील स्थगित करण्यात आले आहे. ऑनलाईन बुकिंग अ‍ॅपवरून तिकीटविक्री झालेल्या शोजचं रिफंड दिले जाणार आहे. सोबत जीम, व्यायामशाळा बंद राहणार आहेत.

किरकोळ आणि घाऊक व्यापार्‍यांची दुकानं

पुण्यात 17,18,19 मार्च या तीन दिवसांसाठी घाऊक आणि किरकोळ व्यापारांनी आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सुमारे 40 हजार दुकानं बंद राहणार आहेत. होजिअरी, स्टेनलेस स्टील, कापड, संगणक, इलेक्ट्रोनिक वस्तू ते खेळणी, केमिकल विक्रेते यांमधील व्यावसायिक सदस्यांचा समावेश आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा चीनमधून पसरायला सुरूवात झाली. जीवघेण्याकोरोना व्हायरसवर अद्याप ठोस उपचार नाहीत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणं टाळा,हात वारंवारं स्वच्छ धुवा, शिंकताना, खोकताना तोंड रूमालाने किंवा हाताच्या बाह्यांनी झाकले जाईल याची खात्री करा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान जगभरात 1 लाख 75 हजारांच्या आसपास रूग्णांना कोरोनाची लागण झाली असुन 6500 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.