Coronavirus: माहिम मच्छिमार कॉलनीत कडकडीत बंद, नागरिकांकडून जीवनावश्यक वस्तूंचा घरात साठा
त्याचसोबत नागरिकांनी त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा आधीच घरी करुन ठेवला आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच सरकारने लॉकडाउनचे आदेश दिल्याने नागरिकांना घरबाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र नागरिकांना लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांनी सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच काही लोक विनाकारण घराबाहेर फिरत असून त्यांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईतील माहिम मच्छिमार कॉलनी (Fisherman Colony) येथे कडकडीत बंद पाळला जात आहे. त्याचसोबत नागरिकांनी त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा आधीच घरी करुन ठेवला आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले परिसर सील केले असून स्थानिकांना घराबाहेर पडण्याची सक्त मनाई आहे. त्यामुळेच माहिम मच्छिमार कॉलनीत स्थानिकांकडून बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला प्रवेश नाकारत आहेत. त्याचसोबत एखाद्याने प्रवेश केल्यास हातात दांडे घेऊन उभे असतात. मच्छिमार कॉलनीत बहुतांश लोक हे कोळी समाजाचे राहतात. तसेच कॉलनीतील घरे एकमेकांना चिकटून उभारण्यात आलेली आहेत. कोरोना व्हायरसच्या प्राश्वभुमीवर त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणूनच स्थानिकांनी बाहेरील व्यक्तीस येण्यास परवनागी न देण्याचा निर्णय सहमतीने घेतला आहे. या कॉलनीच्या परिसरात येणारी सर्व दुकाने आणि फेरीवाऱ्यांवर सुद्धा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ची 33 नवी प्रकरणे, रुग्णांची संख्या 781 वर; मुंबई, पिंपरी- चिंचवड मधील बाधितांची आकडेवारी पहा)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या महासंकटाला दूर करायचे असेल तर नागरिकांनी सरकारने लागू केलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक नाआहे. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहे. मात्र तरीही कोरोनाचे रुग्ण अधिकाधिक वाढत असून महाराष्ट्रात आज 33 नवे प्रकरणे समोर आली असून रुग्णांची संख्या 781 वर पोहचली आहे.