Lockdown: 'महसूल वाढीसाठी वाईन शॉप सुरु करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र
तसेच, राज्यातील महसुली तूट भरून काढण्यासाठी 'वाइन शॉप्स' (Wine Shops) सुरु करण्यात यावीत असेही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट, लॉकडाऊन (Lockdown) आणि राज्यातील महसुली तूट परिणामी राज्यातील तिजोरीत होणारा खडखडाट याबाबत या पत्रात बरेच काही लिहिले आहे. तसेच, राज्यातील महसुली तूट भरून काढण्यासाठी 'वाइन शॉप्स' (Wine Shops) सुरु करण्यात यावीत असेही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील तिजोरीत खडखडाट आहे. महसूली तूट भरुन काढण्यासाठी राज्याच्या तिजोरीत महसुलाची काही प्रमाणत तरी आवक सुरु व्हावीच लागेल. 18 मार्च पासून महाराष्ट्र टाळेबंदीत आहे. आधी 31 मार्च मग पुढे 14 एप्रिल आणि आता 3 मे. ही स्थिती पुढे किती दिवस चालेल याचीही खात्री नाही. त्यामुळे अशा काळात राज्याला महसूलाचा ओघ सुरु करण्यासाठी राज्यात ' वाईन शॉप्स' सुरु करायला काय हरकत आहे? असा सवालही राज यांनी आपल्या पत्रात उपस्थित केला आहे.
आपल्या पत्रात राज ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, 'वाईन शॉप्स' सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15000 कोटी मिळतात. आता जवळपास राज्य 35 दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल. (हेही वाचा, महाराष्ट्र: Lockdown काळात वाईन शॉप वरील बंदी बाबत राजेश टोपे यांच्या 'या' विधानामुळे मद्यप्रेमींच्या आशा झाल्या पल्लवित)
राज ठाकरे ट्विट
आज पोलिसांपासून ते आरोग्य सेवक, नर्सेस ह्या अनेकांकडे पीपीई किट्स नाहीत, लोकांना मोफत जेवण किंवा इतर काही पुरवायचं म्हणलं तर ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करत राज्य सरकार दिवस ढकलतंय कारण त्यांची तिजोरी पण साफ झाली आहे. अगदी सरकारी कर्मचारी वर्गाला पगार द्यायलाही पैसे नाहीत ही परिस्थिती आहे. त्यामुळे 'वाईन शॉप्स'तून मिळणारा महसूल हा मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज आहे, असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी आपले मत मांडत राज्य सरकारला सल्ला दिला आहे.
राज ठाकरे फेसबुक पोस्ट
दरम्यान, आधी राज्यात दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असं कोणी म्हणत नाहीये. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. मराठीत म्हण आहे ना 'ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं' तसं आत्ता राज्याला महसुलाची गरज आहे हे वास्तव स्विकारलं पाहिजे. बाकी जे ह्या दुकानांमध्ये जातील त्यांना शारीरिक अंतर राखून खरेदी करायला लावणं इत्यादी गोष्टींसाठी कडक निकष लावता येतीलच, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.