Coronavirus In Nashik: बाजारपेठांमधील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी 5 रूपयांच्या पावतीवर तासभर खरेदीची मुभा; पोलिस, महापालिकेचा शिस्तीचा नवा बडगा

तसेच बाजपेठेत जाण्यासाठी एका व्यक्तीला तासाभरासाठी 5 रूपये मोजावे लागणार आहेत. एकातासापेक्षा अधिक वेळ बाजारपेठेमध्ये रेंगाळल्यास 500 रूपये दंड आकारला जाणार आहे.

Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ नाशिक शहरामध्येही कोरोनाचं थैमान सुरू आहे. दिवसागणिक रूग्णसंख्या वाढत असल्याने काही दिवसांपूर्वी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा सज्जड दम भरला होता. पण आता लॉकडाऊन लावणं हे अर्थचक्र चालू ठेवण्यामध्ये नुकसानकारक ठरू शकेल या भीतीमुळे प्रशासन आणि पोलिसांनी नियम थोडे कडक केले आहे. बाजरात उसळणारी गर्दी पाहता आता प्रशासनाने बाजारपेठेत जाण्यासाठी 5 रूपयांची पावती फाडून तासाभरात खरेदी उरकण्याचं फर्मान काढलं आहे. दरम्यान हा बाजारपेठांमधील गर्दी आणि फेरीवाल्यांना वचक बसावा म्हणून केलेला उपाय आहे. Anand Mahindra यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला दिला 'हा' महत्त्वपूर्ण सल्ला.

नाशिक मध्ये नव्या नियमांनुसार, आता मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच बाजपेठेत जाण्यासाठी एका व्यक्तीला तासाभरासाठी 5 रूपये मोजावे लागणार आहेत. एकातासापेक्षा अधिक वेळ बाजारपेठेमध्ये रेंगाळल्यास 500 रूपये दंड आकारला जाणार आहे. आणि नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई होईल. सध्या महापालिका आणि पोलिस एकत्र ही कारवाई करत असून शालिमार, नवापुरा, बादशाही कॉर्नर या भागांत बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. बाजारपेठेमध्ये व्यावसातिक आणि फेरीवाल्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत. पासधारकच बाजारात जाऊ शकणार आहेत. हा निर्णय मेनरोड, सिटी सेंटर मॉल आणि पंचवटी बाजार समिती मध्ये लागू आहे. राज्यात नाईट कर्फ्यू लागू असल्याने रात्री 8 नंतर कुणाला परवानगी नाही तर सकाळी 8 ते रात्री 8 असे 12 तास पोलिस देखील तैनात आहेत.

दरम्यान छगन भुजबळ यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचं आवाहन केले आहे. गर्दी केल्यास, कोरोना रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत राहिल्यास 2 एप्रिल पर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा इशारा देखील भुजबळांनी दिला आहे.