Coronavirus in Maharashtra: दशलक्ष लोकसंख्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाबाबत राज्याची परिस्थिती अतिशय उत्तम; रुग्णसंख्या, मृत्यू दर आणि सक्रिय रुग्ण झाले कमी
गेले एक वर्षांपासून कोरोना विषाणूशी (Coronavirus) सामना करीत असलेल्या भारताची स्थिती याबाबत बरीच सुधारली आहे. या संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रभावित राज्य होते, मात्र आता महाराष्ट्राने विषाणूवर काही प्रमाणात विजय मिळवला आहे. महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली. सध्या दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर, कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे असे दिसते. आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली आहे.
2 फेब्रुवारी 2021 च्या आकडेवारीनुसार दर दश लक्ष लोकसंख्येत दिल्ली 37,844, गोव्यात 36, 732, पौंडेचरीत 31, 350, केरळमध्ये 28,089, चंडीगडमध्ये 19,877 इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी 16,008 रुग्ण होते. महाराष्ट्राचा क्रमांक यामध्ये देशात 6 वा होता. एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दशलक्ष लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत 647, गोव्यामध्ये 527, पौंडेचरीत 522 आणि महाराष्ट्रात 403 मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही.
कोरोनाच्या वाढत्या दराचा विचार केला तर 3 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोजचा कोविड वाढीचा दर 0.10% होता, तर केरळचा दर महाराष्ट्रापेक्षा सहापट जास्त म्हणजे 0.61%, गोवा 0.2%, पंजाब 0.12%, गुजरात आणि छत्तीसगड 0.11 % असा दर होता. सक्रिय रुग्णाबाबत महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्येत 290 रुग्ण असताना, केरळमध्ये 2000 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. (हेही वाचा: Mumbai Local: विकेंड्स, सुट्टीच्या दिवशी लोकल सर्वसामान्यांसाठी पूर्ण वेळ सुरु करा, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी)
दरम्यान, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे आरोग्य तपासणी सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाबाबत जाणीवजागृती करण्यात आली. दोन टप्प्यात राबविलेली ही मोहीम कोरोना रोखण्यात फलदायी ठरली. महाराष्ट्राने कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या त्याची दखल वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाईम्स सारख्या जागतिक माध्यमांकडून घेतली गेली.