Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोना विषाणूच्या बाबतीत दिलासा; आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट, महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर
गेले सहा महिने या विषाणूची लढा चालू आहे. अशात आज एक सकारात्मक आणि दिलासादायक बाब समोर आली आहे.
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) बाबतीत सध्या देशात महाराष्ट्र (Maharashtra) हे सर्वात बाधित राज्य आहे. गेले सहा महिने या विषाणूची लढा चालू आहे. अशात आज एक सकारात्मक आणि दिलासादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 11,416 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 26 440 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12,55,779 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,21,156 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.76% झाले आहे.
अशाप्रकारे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 15,17,434 झाली असून एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 40,040 झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 75,69,447 नमुन्यांपैकी 15,17,434 नमुने पॉझिटिव्ह (20.5 टक्के) आले आहेत. राज्यात 22,68,057 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 24,994 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 308 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये सध्या 25,352 सक्रीय रुग्णांच्यावर उपचार सुरु आहेत. (हेही वाचा: शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोना संसर्गामुळे निधन)
एएनआय ट्वीट -
दरम्यान, जनजीवन टप्याटप्याने सुरळीत होत असले तरीही नियम तेवढ्याच काटेकोरपणे आणि गांभीर्याने पाळणे गरजेचे आहे. तसेच तसेच या आजाराबाबत लोकांमध्ये अजून जनजागृती निर्माण व्हावी म्हणून सरकारने 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' सुरु केली आहे. या मोहिमेला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.