Coronavirus: पुण्यातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

दरम्यान, सर्वसामान्य, राजकीय नेते, कलाकारांसह अनेकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत.

योगेश टिळेकर (Photo credit :YouTube)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, सर्वसामान्य, राजकीय नेते, कलाकारांसह अनेकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. यातच भारतीय जनता पक्षाचे नेते पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे भाजप पक्षात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. टिळेकर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची कोरोनाची चाचणी करून घेतली असताना तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्षनेते दत्ता साने यांचा देखील शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- कोविड-19 संसर्गावर नियंत्रण मिळवणे हे सरकारचे प्रथम प्राधान्य, इतर गोष्टी दुय्यम; विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचे उत्तर

योगेश टिळेकर यांचे ट्वीट-

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. पुण्यात आतापर्यंत 26 हजार 956 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 841 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, एकूण 13 हजार 64 जणांनी कोरोनावर मात केली आहे.