Coronavirus: अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेले भाग कंटेनमेंट झोन जाहीर होणार; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आणावा असे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

Coronavirus Outbreak (Photo Credits-IANS)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामधील कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 5,427 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 24 टक्के आहे. अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 8.8 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी   दर 7.76 टक्के एवढा आहे.

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आणावा असे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ज्या भागात नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्या 20 पट अधिक चाचण्यांची संख्या वाढविण्याचे तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. (हेही वाचा: Coronavirus Cases in Maharashtra: मागील 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत महिन्याभरातील सर्वात मोठी वाढ)

यासह नागरिकांनी सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ ठेवणे असे आवाहन करण्यात आले आहे.