Coronavirus: तबलिगी मरकज कार्यक्रमासाठी परवानगी दिलीच कशी? राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्र सरकारवर निशाणा
मात्र, या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली. याकडे लक्ष वेधत देशातले ३५ टक्के करोनाबाधित हे तबलिगी मरकजमुळे झाले आहेत, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.
तबलिगी मरकज (Tablighi Markaz) कार्यक्रम आणि कोरोना व्हायरस (Coronavirus) या विषयावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र आणि देशात तबलिगी मरकजमुळे कोरोना व्हायरस रुग्णांचे प्रमाण वाढले असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्र सरकारने परवानगी दिलीच कशी? असा सवाल उपस्थित करत तबलिगी मरकज प्रकरणावरुन केंद्र सरकारवर देशमुख यांनी निशाणाही साधला. गृहमंत्री अनिल देशमुख आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेले अनेक लोक भारतभर गेले आहेत. महाराष्ट्रात आलेली तबलिगी मरकजमधील 60 लोक आजही मोबाईल बंद करुन बसली आहेत. त्यांचा शोध घेणे सुरु आहे. महाराष्ट्रातही तबलिगी मरकज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्र पलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी या कार्यक्रमास मान्यता नाकारली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशा शब्दांत महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक अनिल देशमुख यांनी केले.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील तबलिगी मरकज कार्यक्रम रद्द करायला हवा होता. मात्र, या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली. याकडे लक्ष वेधत देशातले ३५ टक्के करोनाबाधित हे तबलिगी मरकजमुळे झाले आहेत, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित डोभाल हे मध्यरात्री 2 वाजता मरकजमध्ये का गेले होते? असा सवालही देशमुख यांनी विचारला आहे. (हेही वाचा, 'जितेंद्र आव्हाड तुमचा दाभोळकर होणार': अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर अर्वाच्च्य भाषेत टीका)
एएनआय ट्विट
दरम्यान, गृहमंत्रालयाच्या नावे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरस झाले आहे. या पत्रात राज्याच्या गृहमंत्रालयाकडे कोरोना व्हायरस आणि तबलिगी मरकज प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र, हे पत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने पाठवल्याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झाली नाही. यावरुन भाजपने शंका उपस्थित करत खुलाशाची मागणी केली आहे.
भाजप ट्विट
भाजपच्या ट्विटर हँडलवरुन एका पत्रद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. या पत्रात, ''कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर लिहिलेले एक पत्र फिरत आहे. सदर पत्राच्या सत्यतेबद्दल साशंकता असून त्यामुळे लोकांमधे संभ्रम निर्माण झालेला आहे. वृत्तपत्रे व प्रसार माध्यमांमधे काम करणाऱ्या काही मंडळींचा असा दावा आहे की हे पत्र गृहमंत्र्यांच्या कार्यालयामार्फत त्यांना पाठवले गेले आहे तर काही प्रसार माध्यमे हे पत्र खोटे अथवा बनावट असल्याचा दावा करत आहेत असं त्यांनी सांगितले आहे'', त्यामुळे या पत्राबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.