मुंबई: BMC मधील 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील
मुंबईत कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. आता मुंबई महापालिकेतही (Brihanmumbai Municipal Corporation) कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. मुंबई पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील 2 जणांना संसर्ग झाला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष खबरदारी म्हणून पालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील करण्यात आले आहे. यामुळे मुंबई महापालिका कार्यलयाच्या परिसरात घबराट पसरली आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोनाच्या जाळ्यात अडकडून जगभरात आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास 25 लाख लोकांना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करत आहेत. परंतु, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यापैंकी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील 2 जण कोरोनाबाधीत आढळल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हेतर, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सील करण्यात आले आहे. हे देखील वाचा- नांदेड येथे भाजीपाला खरेदी करण्यासााठी गर्दी करत नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन
राज्यात कोरोनाबाधितांचा आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलांडला आहे. काल (20 एप्रिल) राज्यात नव्या 552 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 200 झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाबळींची संख्या ही 223 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 456 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 724 वर पोहोचला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.