IPL Auction 2025 Live

Congress to Hold Protests: पीएम नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी; कॉंग्रेसचे उद्यापासून 'प्रधानमंत्री माफी मागो' आंदोलन- Nana Patole

जेव्हा हे मजूर अडचणीत होते तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी पंतप्रधान लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगत होते.'

Nana Patole (Photo Credits-ANI)

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रावर इतर राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्ग पसरवल्याचा आरोप केला. पीएम मोदींच्या या वक्तव्यावरून सध्या राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी याचा निषेध केला असून, आता महाराष्ट्राचा ‘अपमान’ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने मंगळवारी केली. पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, पंतप्रधानांनी इथल्या जनतेची माफी मागावी या मागणीसाठी विरोधी पक्ष बुधवारी राज्यातील भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने करणार आहे.

सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा देश कोरोनाशी एकजुटीने लढत होता, तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुंबईच्या रेल्वे स्थानकाबाहेर उभे राहून मजुरांना रेल्वेची तिकिटे मोफत वाटत होते. त्यांनी मजुरांची काळजी घेण्याच्या जबाबदारीतून सुटका करून घेतली आणि मजुरांना त्यांच्या गावी पाठवले आणि यूपी-बिहार आणि देशभरात कोरोना पसरवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी हे बोलत होते.

त्यानंतर आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. आज प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या आरोपांचे खंडन केले आणि महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांची कॉंग्रेसने उत्तम काळजी घेतली, त्यांना दोन वेळचे जेवण दिले आणि राहण्यासाठी निवारा दिला, असे सांगितले.

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान हे भाजपचे प्रचारक असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी काल केलेले भाष्य हे छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजप आणि पंतप्रधानांनी याबाबत जाहीर माफी मागावी. महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, इतर राज्यांना मदत केली. महाराष्ट्राने धीरूभाई अंबानी, गौतम अदाणी यांना मोठे केल. बाहेरून स्टार बनण्यासाठी आलेले, उपजीविका करण्यासाठी आलेल्या अनेकांना राज्याने मोठे केले. अशा महाराष्ट्राला अपमानित केले गेले याचा निषेध आहे. भाजपच्या राज्यातील मोठ्या नेत्यांनीही माफी मागायला पाहिजे. याबाबत आम्ही भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. (हेही वाचा:  'देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग हा 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे वाढला'; मंत्री Nawab Malik यांचे प्रत्युत्तर)

नाना पटोले पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातील नमस्ते ट्रम्प सारखे कार्यक्रम करून देशात कोरोनाचा प्रसार करणारे नरेंद्र मोदीच कोरोनाचे खरे स्प्रेडर आहेत. जेव्हा हे मजूर अडचणीत होते तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी पंतप्रधान लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगत होते आणि आपल्या निवासस्थानी मोरांना दाणे खाऊ घालण्यात व्यस्त होते.’