Sachin Vaze Arrested : भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न; नाना पटोले यांचा पलटवार

भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Nana Patole | (Photo Credits: Facebook)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्या प्रकरणी एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze) यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर या प्रकरणी नवनवी माहिती समोर येत असून विरोधक अधिकच आक्रमक झाले आहेत. तर महाविकास आघाडी सरकारकडून विरोधकांवर पलटवार करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील विरोधकांवर सांगली येथे प्रत्रकारांशी बोलताना भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"मुकेश अंबानी कुटुंबियांसाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवले जात आहे. अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षेसाठी आणि त्यांच्या घरावर हेलिकॉप्टर परवानगी मिळावी, यासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला," अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्रला बदनाम करण्याचे काम विरोधक करत आहेत. यापूर्वी सुशात सिंह राजपूत प्रकरणात तीन महिने राज्याची बदनामी केली. भाजप डबल ढोलकी वाजवायचे काम करत आहे. त्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल." (Sanjay Raut यांचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल; महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा पाठवून महाविकास आघाडी सरकार आणि Mumbai Police यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न)

"यापूर्वी महाविकास आघाडी सरकार पडेल असे विरोधक बोलत होते. आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडून महाविकास आघाडीकडून सत्ता कशी जाईल, याचा प्रयत्न विरोधक करत आहेत," असेही ते म्हणाले. तसंच महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष टिकणार असा दावाही त्यांनी यावेळी  बोलताना केला. दरम्यान, सचिन वाझे प्रकरणी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांनी विरोधकांना सडेतोड उत्तरं दिली आहेत.