महाराष्ट्रात काँग्रेसला बसू शकतो मोठा झटका; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण

नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांचीही त्यांनी दिल्लीत भेट घेतली होती.

Ashok Chavan (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Former Chief Minister Ashok Chavan) गुरुवारी गणेश दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या वरळीतील घरी पोहोचले होते. येथे त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. ते कधीही भारतीय जनता पक्षात जाण्याची शक्यता आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी त्यांची जवळीक अलीकडच्या काळात दिसून येत आहे. याशिवाय ते काँग्रेसच्या G-23 या बंडखोर गटाचे सदस्य आहेत. नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांचीही त्यांनी दिल्लीत भेट घेतली होती.

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि एमएलसी निवडणुकीत आशिष कुलकर्णी यांनी रणनीतीकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुलकर्णी यांनी शिवसेना सुप्रीमो बाळ ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांसोबत काही काळ काम केले आहे. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबतही काम केले होते. (हेही वाचा - Devendra Fadnavis & Ashok Chavan: कथीत भेटीचे देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांच्याकडून खंडण; राजकीय वर्तुळात मात्र उलटसूलट चर्चा)

मात्र, अशोक चव्हाण लवकरचं दिल्लीतील भारत जोडो काँग्रेसच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या सर्व अटकळांना साफ नकार दिला आहे. एबीपी या वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आले तेव्हा मी आशिष कुलकर्णी यांच्या घरीही गणेश दर्शनासाठी पोहोचलो. अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत आमची सौहार्दपूर्ण बैठक झाली. असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे."

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती सरकारच्या फ्लोअर टेस्टमध्ये काँग्रेसच्या इतर नऊ आमदारांसह विधानसभेत सहभागी झाल्यामुळे अशोक चव्हाण भाजप नेत्यांच्या जवळ गेल्याची बातमी समोर आली. पृथ्वीराज चव्हाण आणि चंद्रकांत हंडोरे यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी एमएलसी निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांसोबत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर केला होता.

दरम्यान, अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. अशोक चव्हाण यांनी 2008 ते 2010 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाच्या हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते.