'काँग्रेस हे 'बुडणारे जहाज', गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केलेले मुद्दे वैध'- उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

त्यांनी पत्रात लिहिले की, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर (2013) जुनी काँग्रेस विसर्जित झाली, त्यामुळे पक्षातील तळागाळातील नेते हळूहळू दूर होत गेले.

Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

काँग्रेसशी (Congress) दीर्घकाळ संबंध असलेले नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचा उल्लेख 'बुडणारे जहाज' असा करत, फडणवीस म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडताना वैध मुद्दे उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे. हे बुडणारे जहाज वाचवता येणार नाही हे ज्यांना माहीत आहे, ते परिस्थिती टाळण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेत आहेत. मला वाटते की आझाद यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न योग्य आहेत. मात्र, ही त्यांची अंतर्गत बाब असून त्यावर मी भाष्य करणार नाही.’ शिवसेनेने संभाजी ब्रिगेड या मराठा संघटनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयावरही देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जेव्हा एखाद्याचा नाश किंवा पतन होण्याची वेळ येते तेव्हा माणूस शहाणपणाने विचार करण्यास अपयशी ठरतो.

दुसरीकडे, दसरा जवळ आल्याने शिवसेनेचे दोन्ही गट या उत्सवादरम्यान वार्षिक मेळाव्यासाठी परवानगी मागण्याची शक्यता आहे. शिवसेना परंपरेनुसार, मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांना मुंबईत रॅलीची परवानगी दिली जाईल का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, कार्यक्रमांना नियमानुसार परवानगी दिली जाईल. आम्ही नियमांचे उल्लंघन होऊ देणार नाही.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षाच्या धोरणांबद्दल ते बराच काळ नाराज होते. काँग्रेस अध्यक्षांना दिलेल्या पाच पानी राजीनामा पत्रात आझाद यांनी आपण जड अंत:करणाने हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. गुलाम नबी म्हणाले की, काँग्रेसने लढण्याची इच्छाशक्ती आणि क्षमता गमावली आहे. (हेही वाचा: मनसे लवकरच हलाल मांसाविरोधात मोहीम करणार सुरू, मीटमधून मिळणाऱ्या कमाईचा वापर टेरर फंडिंगसाठी झाल्याचा केला आरोप)

गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पत्रात लिहिले की, राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर (2013) जुनी काँग्रेस विसर्जित झाली, त्यामुळे पक्षातील तळागाळातील नेते हळूहळू दूर होत गेले. यासोबतच त्यांनी पक्षाला सल्ला दिला आहे की, यावेळी काँग्रेसला भारत जोडो यात्रेपेक्षा काँग्रेस जोडो यात्रेची जास्त गरज आहे.