Mumbai Local Update: सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने दिलेल्या 'या' प्रतिक्रियेमुळे मुंबईकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण
सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या मागणीबाबत रेल्वे बोर्डाला कळवण्यात येईल. बोर्डाने मान्यता दिल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
Mumbai Local Update: मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आज सांगितलं आहे. यासंदर्भातील एक पत्र मध्य व पश्चिम रेल्वेला देण्यात आलं आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की, राज्य सरकारने दिलेलं पत्र आम्हाला मिळालं आहे. सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या सरकारच्या मागणीबाबत रेल्वे बोर्डाला कळवण्यात येईल. बोर्डाने मान्यता दिल्यानंतर त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेनंतर मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. 1 फेब्रुवारीपासून लोकल ट्रनने प्रवास करता येणार की, नाही असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. (वाचा - Mumbai Local 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवासासाठी खुली पण केवळ 'या' वेळेत करता येणार प्रवास)
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर सर्वसामान्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत 1 फेब्रुवारीपासून विशिष्ट वेळेत सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून सर्वसामान्यासाठी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.