IPL Auction 2025 Live

Coldplay Tickets Case: कोल्डप्ले तिकीट विक्रीमध्ये घोटाळा झाल्याची शक्यता बळावली; मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी दोनदा समन्स बजावूनही BookMyShow चे CEO राहिले गैरहजर

आर्थिक गुन्हे शाखा पोलीस लवकरच तिसरे समन्स बजावण्याची शक्यता आहे.

BookMyShow (Photo Credits: BookMyShow Twitter)

Coldplay Tickets Case: तिकिट प्लॅटफॉर्म बुकमायशोवर (BookMyShow) आगामी कोल्डप्ले कॉन्सर्टच्या (Coldplay Concert) शोच्या तिकीटांचा काळाबाजार करण्याचा कट रचला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकील अमित व्यास यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बुकमायशोची मूळ कंपनी बिग ट्री एंटरटेनमेंटचे सीईओ आशिष हेमराजानी आणि कंपनीचे तांत्रिक प्रमुख यांना, सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नवीन समन्स बजावले होते. मात्र, सीईओ सलग दुसऱ्यांदा पोलिसांसमोर हजर राहू शकले नाहीत. मुंबई पोलिसांनी बजावलेले हे दुसरे समन्स होते. त्यानंतर आता कोल्डप्ले तिकीट विक्रीमध्ये घोटाळा झाल्याची शक्यता बळावली आहे.

वृत्तानुसार, हेमराजानी यांनी मुंबई पोलिसांच्या समन्सला ईमेलद्वारे किंवा त्यांच्या वकिलामार्फत उत्तर दिलेले नाही, त्यांनी पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलीस लवकरच तिसरे समन्स बजावण्याची शक्यता आहे. बुकमायशोने पुढील समन्सकडे दुर्लक्ष केल्यास, पोलीस संबंधित विभागांशी सल्लामसलत करून कायदेशीर मार्ग पत्करू शकतात, असे अहवालात म्हटले आहे.

Coldplay Tickets Case-

याआधी 27 सप्टेंबर रोजी बुकमायशोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तांत्रिक प्रमुख दोघांना शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी पहिले समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी दोन्ही समन्सकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान वकील व्यास यांनी आधीच आर्थिक गुन्हे शाखेला निवेदन नोंदवले आहे. त्यामध्ये आरोप आहे की, बुकमायशो जाणीवपूर्वक सामान्य जनता आणि कोल्डप्लेच्या चाहत्यांची फसवणूक करण्यासाठी फसव्या क्रियाकलापांमध्ये गुंतले आहे. फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी ते करत आहेत. (हेही वाचा: Coldplay Ticket Row: कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या काळाबाजारावरून राजकारण तापलं; राम कदम म्हणाले, 'पैसे कमावण्यासाठी आखण्यात आले सुनियोजित षडयंत्र)

कोल्डप्लेची तिकिटे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार होती, मात्र बुक माय शोने काळाबाजारात गुंतलेल्या एजंट्ससाठी विशेष लिंक्स तयार केल्या, ज्यामुळे त्यांना तिकिटांसाठी वाढीव किमती आकारता आल्या. या प्रकारामुळे अनेक चाहत्यांना आहे त्या किंमतीमध्ये तिकिटे विकत घेता आली नाहीत. कोल्डप्ले कॉन्सर्टची तिकिटे ज्याची मूळ किंमत 2,500 रुपये होती ती तब्बल 3 लाख रुपयांना विकली होती, असेही अधिवक्ता व्यास म्हणाले.