Cold Wave in Maharashtra: मुंबईत तापमानात घट; IMD ने दिला महाराष्ट्राच्या काही भागांसाठी थंड लाटेचा इशारा

परंतु महाराष्ट्राच्या काही उत्तर भागात 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पारा खाली घसरताना दिसत आहे. रविवारी किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने मुंबईच्या तापमानात घसरण सुरू झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत शहरातील तापमान साधारणपणे सरासरी 24-30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. रविवारी आर्द्रतेचे प्रमाण 47 टक्क्यांपर्यंत घसरल्याने हवामानातील कोरडेपणाही वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी थंड लाटेचा इशाराही जारी केला आहे.

आयएमडीचे अधिकारी केएस होसाळीकर यांच्या मते, सध्या संपूर्ण भारतातील किमान तापमान वायव्य, उत्तर आणि मध्य भारतातील बहुतेक भागांमध्ये सुमारे 10 डिग्री सेल्सिअस घसरण्याची शक्यता दर्शवते. पुणे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये आयएमडीने थंड लाटेचा इशारा जारी केला आहे त्यात धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना यांचा समावेश आहे.

रविवारी महाराष्ट्रात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद जळगावमध्ये 8.5 अंश सेल्सिअस, त्यानंतर औरंगाबाद (9.2 अंश सेल्सिअस), पुणे (9.7 अंश सेल्सिअस) आणि नाशिक (9.8 अंश सेल्सिअस) येथे झाली. तर मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 19.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आज ओझरमध्ये 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंत ही राज्यातील निचांकी तापमानाची नोंद आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: नाशिक मध्ये पारा 9.2 अंश सेल्सिअस; हंगामातील निच्चांकी नोंद)

आयएमडीने मुंबईत पुढील दोन दिवस सरासरी किमान आणि कमाल तापमान 20 ते 33 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. परंतु महाराष्ट्राच्या काही उत्तर भागात 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे.सायंकाळच्या थंड वाऱ्याबरोबरच, सांताक्रूझ येथे शहरातील आर्द्रतेचे प्रमाणही 47 टक्क्यांपर्यंत घसरले, तर कुलाबा येथे 60 टक्के आर्द्रता अनुभवली. दुसरीकडे, शहराचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) 133 वर ‘मध्यम’ श्रेणीत राहिला.