CNG Price Hike: सीएनजी दराची 6 रुपयांची उसळी, एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढ; पुणेकर कातावले
पुण्यात तर सीएनजी (CNG Rates) दरात पुन्हा वाढ झाली आहे. हे दर प्रति किलो 6 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे एका किलोसाठी पुणेकरांना आता तब्बल 91 रुपये मोजावे लागणार आहेत
बेरोजगारीने (Unemployment) आगोदर कंबरडे मोडले असताना महागाईचे प्रमुख कारण असलेल्या इंधन दरांची त्यात आणखी भर पडत आहे. पुण्यात तर सीएनजी (CNG Rates) दरात पुन्हा वाढ झाली आहे. हे दर प्रति किलो 6 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे एका किलोसाठी पुणेकरांना आता तब्बल 91 रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (Maharashtra Natural Gas Limited) म्हणजेच एमएनजीएल (MNGL) ने ही दरवाढ केली आहे. 4 ऑगस्टपासून ही दरवाढ लागू झालीसुद्धा.
सीएनजी दरात प्रति किलो 6 रुपयांनी वाढ झाल्याने पूर्वीच्या प्रति 85 रुपये/किलोवरून आता हिच किंमत 91 रुपये/किलो झाली आहे. एका महिन्यात दर वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीची दरवाढ जुलैमध्ये जाहीर करण्यात आली होती. (हेही वाचा, Congress Protest: काँग्रेस आंदोलन; राहुल गांधी, Priyanka Gandhi Vadra पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्ते आक्रमक; काय घडलं आतापर्यंत?)
एमएनजीएलच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सीएनजी किमतीतील सुधारणा पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या शहरांना लागू आहे.नैसर्गिक वायूच्या किमतीत 18 % वाढ झाली आहे. त्यामुळे इनपुट गॅसच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम ग्राहकांना दिलेल्या अंतिम किंमतीवर होतो, असेही ते म्हणाले. इंडिया टुडेने या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पुण्यातील ऑटोरिक्षा संघटनांनी सीएनजीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (आरटीए) ऑटोच्या भाड्यात सुधारणा करण्यास सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला एप्रिलमध्ये सीएनजीची किंमत 62 रुपये इतकी होती. गेल्या चार महिन्यांत किंमत जवळपास 29 रुपयांनी वाढली आहे. देखभाल आणि इतर खर्चही वाढले आहेत. ही वाढ केव्हा थांबेल हे आम्हाला माहित नाही, अशी भावना रिक्षावाले व्यक्त करत आहेत.