Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पुन्हा लॉकडाऊनचा इशारा; पहा काय म्हणाले
मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच मुंबईत आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळेच मुंबईत (Mumbai) आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. तसंच कोरोना नियमांचे पालन न केल्यास तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, असेही ते म्हणाले. आज (शनिवार, 21 ऑगस्ट) कालिना येथे बाल कोविड सेंटरच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. या संकटावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मात करायची आहे. मात्र, आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो आणि नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (Coronavirus: कोरोनाचा धोका टळलेला नाही, तिसऱ्या लाटेला आमंत्रित करू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन)
पुढे ते म्हणाले की, राज्यात ऑक्सिजन साठ्यात हवी तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याने उपलब्ध असलेल्या साठ्यापर्यंत आपण पोहचलो आणि पुन्हा ऑक्सिजनची गरज भासू लागली तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल.
राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज वाढल्याने सुमारे 500 मेट्रिक टन ऑक्सिजन इतर राज्यांतून आणला होता. त्यामुळे निर्बंध शिथिल केले असले तरी गर्दी टाळून नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना निर्बंध शिथिल केले असून लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकल, बस, मेट्रोने प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.