CIDCO Lottery 2026 Registration: 'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस, मुदतवाढ नाही!
सिडकोच्या 'माझे पसंतीचे सिडको घर' या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४,७७९ घरांसाठी अर्ज करण्याची आणि बुकिंग रक्कम भरण्याची अंतिम मुदत आज ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजता संपत आहे. सिडकोने स्पष्ट केले आहे की या मुदतीनंतर कोणतीही वाढ दिली जाणार नाही.
CIDCO Lottery Last Date to Submit Preference: नवी मुंबईत (Navi Mumbai) परवडणाऱ्या दरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (CIDCO) च्या 'माझे पसंतीचे सिडको घर' या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणी आणि बुकिंग रक्कम भरण्याची अंतिम मुदत आज, 3 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजता संपत आहे. सिडकोने स्पष्टपणे नमूद केले आहे की या तारखेनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. यासाठी आजच https://booking.cidcohomes.com/ वर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेची पार्श्वभूमी
सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. या योजनेत एकूण 4779 एक बेडरूम-हॉल-किचन (1 बीएचके) घरांचा समावेश आहे. यापैकी सर्वाधिक 4229 घरे तळोजा सेक्टर 39 येथे, तर 293 घरे खारघर बस डेपो आणि 257 घरे कळंबोली बस डेपो परिसरात उपलब्ध आहेत.
घरांच्या किमती आणि क्षेत्रफळ
प्रत्येक घराचे कार्पेट क्षेत्रफळ अंदाजे 27 चौरस मीटर इतके आहे. तळोजा येथील घरांची किंमत सुमारे 223.50 लाख रुपयांपासून सुरू होते, तर कळंबोली येथे ही किंमत 37.70 लाख रुपयांपर्यंत आणि खारघर येथे 43.50 लाख रुपयांपर्यंत जाते. ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेशी (पीएमएवाय) संलग्न असून, पात्र लाभार्थ्यांना त्याअंतर्गत अतिरिक्त लाभ मिळू शकतो.
पात्रता निकष
'माझे पसंतीचे सिडको घर' या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि देशात कुठेही त्याच्या नावावर पक्के घर नसावे, अशी अट घालण्यात आली आहे. ईडब्ल्यूएस श्रेणीतील घरांसाठी बुकिंग रक्कम 75 हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, ही रक्कम निवडलेल्या घराच्या प्रकारानुसार आणि श्रेणीनुसार बदलू शकते. नक्की वाचा: CIDCO Lottery 2026: 'माय प्रिफर्ड सिडको होम' साठी अर्ज करताना 'ही' कागदपत्रे ठरणार अनिवार्य .
अर्ज प्रक्रिया आणि पुढील टप्पे
इच्छुक अर्जदारांना सिडको होम्सच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करून, उपलब्ध घरांपैकी 15 पसंतीक्रम निवडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर बुकिंग रक्कम भरून अर्ज पूर्ण करावा लागतो. सर्व आवश्यक कागदपत्रे सेल्फ अटेस्टेट करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घरांचे वाटप संगणकीकृत सोडतीद्वारे केले जाणार आहे. सोडतीची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. सोडतीत यश न मिळालेल्या अर्जदारांची बुकिंग रक्कम 30 दिवसांच्या आत परत केली जाईल, तर यशस्वी अर्जदारांना लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) जारी करून पुढील पैसे भरण्याचे वेळापत्रक कळवले जाईल.
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2026 11:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

