CIDCO Lottery 2026: 'माय प्रिफर्ड सिडको होम' साठी अर्ज करताना 'ही' कागदपत्रे ठरणार अनिवार्य
सिडकोच्या 'माय प्रिफर्ड सिडको होम' योजनेअंतर्गत घर मिळवण्यासाठी अर्जदारांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात, याची संपूर्ण यादी आणि तपशील येथे देण्यात आला आहे.
नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोच्या 'माय प्रिफर्ड सिडको होम' या योजनेत 4779 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये तळोजा सेक्टर-३९ येथे सर्वाधिक ४,२२९ सदनिका उपलब्ध आहेत. याशिवायर कळंबोली बस डेपो परिसरात २५७ आणि खारघर बस डेपो परिसरात २९३ सदनिका देण्यात येणा आहेत. मग 15 ऑगस्टपासून या घरांसाठी सुरू झालेल्या बुकिंग प्रक्रियेत ग्राहकांना अर्ज करताना काही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व अर्जदारांना मूलभूत कागदपत्रांसह त्यांच्या श्रेणीनुसार अतिरिक्त कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. पहा तुमच्यासाठी आवश्यक कागदपत्रं नेमकी कोणती आहेत?
सर्व अर्जदारांसाठी सामायिक कागदपत्रे
योजनेत अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- रहिवास प्रमाणपत्र (माजी सैनिकांना यातून सूट असून, अर्जदार महाराष्ट्रातील कोणत्याही भागात किमान १५ वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे)
- ई-मेल आयडी
- अलीकडील छायाचित्र
- सह-अर्जदार असल्यास त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड (लागू असल्यास)
उत्पन्नाचा पुरावा कसा द्यावा?
अर्जदाराच्या उत्पन्नाचा विचार करताना मूळ वेतन, महागाई भत्ता (डीए), सीएए, तसेच वैद्यकीय, धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन आणि एचआरए वगळता इतर सर्व प्रकारचे भत्ते, विशेष भत्ते, बोनस आणि ओव्हरटाइम यांचा समावेश केला जातो.
उत्पन्नाचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करता येते:
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष २०२३-२४ चे तपशीलवार आयकर विवरणपत्र (आयटीआर) - केवळ पहिले पान ग्राह्य धरले जाणार नाही
- तहसीलदाराने दिलेले किमान तीन आर्थिक वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र, किंवा
- नियोक्त्याने दिलेल्या मागील १२ महिन्यांच्या वेतन पावत्या, ज्यावर नियोक्त्याचे टॅन (TAN) आणि पॅन (PAN) नमूद असणे आवश्यक आहे, किंवा
- नियोक्त्याच्या टॅन आणि पॅन क्रमांकासह लेटरहेडवर दिलेला उत्पन्नाचा दाखला
श्रेणीनिहाय आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे
मूलभूत कागदपत्रांव्यतिरिक्त, अर्जदार ज्या गटात मोडतो त्यानुसार खालील अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतात.
गट अ - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस)
अर्जदार किंवा त्यांचा पती/पत्नी आणि अविवाहित मुलांच्या नावे भारतात पक्के घर नसल्याचे फॉर्म-अ द्वारे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. शासकीय अनुदान हवे असल्यास पीएमएवाय संकेतस्थळावर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नोंदणी केलेले प्रमाणपत्रही जोडावे लागते.
गट ब - अल्प उत्पन्न गट (एलआयजी)
अर्जदार किंवा त्यांच्या जोडीदार आणि अविवाहित मुलांच्या नावे नवी मुंबईत घर नसल्याचे फॉर्म-ब द्वारे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती / जमाती / भटक्या व विमुक्त जमाती
सक्षम प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेले जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास) सादर करावे लागते.
दिव्यांग (शारीरिक विकलांग)
दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा, २०१६ अंतर्गत सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. यामध्ये अंधत्व, कमी दृष्टी, कुष्ठरोगातून बरे झालेले, श्रवणदोष, अस्थिव्यंग, मानसिक मंदता, ऑटिझम, मानसिक आजार, विशिष्ट शिकण्यासंबंधी अपंगत्व आणि बौद्धिक अपंगत्व यांचा समावेश होतो. पात्रतेसाठी किमान ४०% अपंगत्व असणे बंधनकारक आहे.
राज्य सरकारी / स्थानिक स्वराज्य संस्था / सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी
किमान ५ वर्षांचा सेवाकालावधी पूर्ण असणे आवश्यक असून, शासकीय आस्थापनेच्या लेटरहेडवरील फॉर्म-क आणि कर्मचारी ओळखपत्र सादर करावे लागते.
सिडको कर्मचारी
संस्थेत किमान ५ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सिडकोच्या लेटरहेडवरील फॉर्म-क आणि ओळखपत्र सादर करावे लागते.
महाराष्ट्रातील पत्रकार
पत्रकारांचे प्रतिज्ञापत्र (फॉर्म-ड) आणि सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (पीआरओ) दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
धार्मिक अल्पसंख्याक
धार्मिक अल्पसंख्याक असल्याचे घोषणापत्र (फॉर्म-इ) सादर करावे लागते.
प्रकल्पग्रस्त व्यक्ती (महाराष्ट्र)
प्रकल्पग्रस्त कुटुंबाच्या वंशावळीचे शपथपत्र, निवाडा प्रत, ७/१२ उतारा किंवा संबंधित विभाग/कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आवश्यक आहे.
माजी सैनिक व त्यांचे आश्रित, तसेच निमलष्करी दल
ओळखपत्र, सेवा पुस्तिका किंवा जिल्हा सैन्य मंडळ अथवा संबंधित प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करावे लागते.
माथाडी कामगार
मुंबई महानगर प्रदेशातील माथाडी कामगारांसाठी एपीएमसी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
कागदपत्रे सादर करताना घ्यावयाची काळजी
सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित (सेल्फ-अटेस्टेड) स्कॅन प्रती जेपीजी, पीएनजी किंवा पीडीएफ स्वरूपात असाव्यात. या फाईल्सचा आकार २ एमबीपेक्षा जास्त नसावा. याशिवाय, जात प्रमाणपत्र आणि निवास प्रमाणपत्रासाठी बारकोड असलेले दस्तऐवज सादर करणे अनिवार्य आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

