'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घरातून कारभार', विरोधकांच्या आरोपावर परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रहार
अनिल परब म्हणाले की, वर्षा बंगल्यावरुन बैठका घेण्याला जर कोणी घरुन काम करणे म्हणत असेल तर या आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत होते? ते देखील वर्षा बंगल्यावरुन म्हणजे घरुनच काम करत होते असे म्हणायला हवे असेही परब यांनी सांगितले.
राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात जनतेत, राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन दौरे करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे घरातूनच राज्याचा कारभार हाकत आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे. या आरोपाला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आक्रमक स्वरुपात उत्तर दिले आहे. अनिल परब यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरुन ते सातत्याने बैठका घेत आहेत. प्रत्येक वेळी राज्यात फिरायलाच पाहिजे असे नाही. आवश्यकता भासेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्व:ता दौरे करत आहेत. जे लोक आज आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या टीकेत काहीही दम नाही. केवळ कोणाला तरी बदनाम करायचे म्हणून हे लोक टीका करत आहेत.
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले की, वर्षा बंगल्यावरुन बैठका घेण्याला जर कोणी घरुन काम करणे म्हणत असेल तर या आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत होते? ते देखील वर्षा बंगल्यावरुन म्हणजे घरुनच काम करत होते असे म्हणायला हवे असेही परब यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे नेते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत असे विचारले असता, विरोधी पक्षाचे नेते आता दौरे करत आहेत. मात्र, महाविकासआघाडी सरकारचे मंत्री या आधीपासून विदर्भात कार्यरत आहेत. आमचे एकनाथ शिंदे तिथे आहेत. विजय वडेट्टीवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत, असेही अनिल परब म्हणाले. (हेही वाचा, 'मी पुन्हा येईन हे जनतेला आवडले की नाही? याचा शोध घेईन' असे म्हणत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला)
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे की, कोरोना व्हायरस संकटात जनता असताना हे सरकार मात्र बदल्यांचा धंदा करतं आहे. एखाद्या वर्षी सरकारी बदल्या झाल्या नाहीत तर, काय बिघडणार आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात न फिरता घरात बसून काम करत आहेत. एकदोन अपवाद वगळता ते घरातून बाहेर पडत नाहीत. कोरोना व्हायरस संकट काळात आणि राज्यात विविध ठिकाणी पूरस्थिती असताना त्यांनी घरातून बाहेर पडणे अपेक्षीत आहे. मात्र, तसे न करता ते घरातच बसून काम करत आहेत, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.