चलो अयोध्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज Ayodhya येथे घेणार राम लल्लाचे दर्शन; कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शरयू आरती टाळली
7 मार्च रोजी ते अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतील
महाविकास आघाडीने राज्यात आपल्या सरकारचे 100 दिवस पूर्ण केल्यानंतर आता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अयोध्याला जाणार आहेत. 7 मार्च रोजी ते अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतील. परंतु या दौर्यावरही कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट दिसून येत आहे. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरे शरयू आरती (Sarayu Aarti) करणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत, शुक्रवारी या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एकूण अयोध्या दौऱ्याविषयी माहिती दिली.
संजय राऊत यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी दुपारी दोन वाजता लखनऊला पोहोचतील. यानंतर रस्तेमार्गाने ते अयोध्येत दाखल होती. सायंकाळी 4.30 वाजता ते राम लल्लाचे दर्शन घेतील. यावेळी त्यांची पत्नी व मुलगा आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत असणार आहेत.' शरयू आरतीच्या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, 'पंतप्रधानांनी कोरोना विषाणूबद्दल चिंता व्यक्त केली आहे, गृहमंत्री आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूचा विचार करता, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमा होण्याची परिस्थिती टाळली पाहिजे अशा सूचना आहेत. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो, त्यानंतर शरयू आरती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
या दरम्यान संजय राऊत यांनी आपल्या आधीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, 'सर्व पक्षांनी राम मंदिर बांधण्यात सहकार्य करावे. कॉंग्रेस, अन्य पक्ष, ओवेसी, ममता बॅनर्जी यांनीही अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घ्यावे.' यावेळी उद्धव ठाकरे 2000 कार्यकर्त्यांसह श्री रामाचे दर्शन घेणार आहेत, ज्यासाठी सर्व कार्यकर्ते सायंकाळी उशिरा अयोध्येत पोहोचत आहेत. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही; हनुमान गढीचे महंत राजू दास यांची धमकी)
दरम्यान, भाजपशी प्रदीर्घ काळापासून राजकीय भागीदार असलेली शिवसेना आता महाराष्ट्रात कॉंग्रेसबरोबर सरकार चालवत आहे. परंतु या अयोध्या दौऱ्यातून शिवसेना अजूनही आपला हिंदुत्व अजेंडा कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.