लॉकडाऊन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल; उदयनराजे भोसले यांचा सरकारला इशारा
यावरुन भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्य सरकराला नियमावलीचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या (Rising Covid-19 Cases) पार्श्वभूमीवर 5 एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरुन राज्य सरकारला विरोधकांकडून अनेक सूचना केल्या जात असून नियमावलीत बदल करण्याचेही सुचवण्यात येत आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी देखील राज्य सरकराने नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.
उदयनराजे भोसले यांनी ट्विटमध्ये म्हटले, "लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल. सरकारने पुन्हा विचार करून व्यापारीवर्गाशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा. लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे."
छत्रपती उदयनराजे भोसले ट्विट:
यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना लॉकडाऊन नियमावलीत बदल करण्यासाठी पत्र लिहिले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील काही नियमावलीसंदर्भात काही विशेष सूचना केल्या आहेत. (Raj Thackeray on CM Uddhav Thackeray: 'राज्य' उद्धव ठाकरे यांच्यावर आले आहे, की त्यांच्या हातात आले? राज ठाकरे यांची मिश्कील कोटी)
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या कोविड-19 रुग्णवाढीमुळे राज्यात 5 एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून 30 एप्रिलपर्यंत ते कायम राहणार आहेत. या कालावधीत सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध असणार असून शनिवार-रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.