Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नट आणि बोल्ट गंजले होते; PWD ने दिलेल्या इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष, अहवालात समोर आली माहिती

कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध संगनमत, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप आहे.

Chatrapati Shivaji Maharaj Statue (PC - X)

महाराष्ट्रातील मालवण, सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथे असलेल्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) काल कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी त्याचे उद्घाटन केले होते, मात्र वर्षभरातच पुतळा पडल्याने विरोधक शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या प्रकरणात गंभीर निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या घटनेबाबत सर्वसामान्यांमध्येही संताप व्यक्त केला जात असून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हटले जात आहे.

आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठेकेदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध संगनमत, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप आहे. पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, त्यात वापरलेले नट व बोल्ट गंजलेले आढळून आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) केला आहे. त्यानंतर केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

या पुतळ्याच्या दुरवस्थेबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी यापूर्वीच चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्यानेही पुतळ्याबाबत इशारा दिला होता. मात्र इशाऱ्यांनंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. पीडब्ल्यूडीने सांगितले की, गंजलेल्या नट आणि बोल्टमुळे पुतळ्याच्या स्थिरतेला धोका निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले होत्रे, तरीही इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. (हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: 'त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करू'; मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर CM Eknath Shinde यांचे स्पष्टीकरण)

सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, पुतळा गंजण्याबाबत पीडब्ल्यूडीने नौदलाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती. पुतळा बनवण्यासाठी वापरलेले स्टील गंजू लागले होते. पुतळा उभारणीचे कोणतेही कौशल्य नसलेल्या भारतीय नौदलाकडे पुतळा उभारणीची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर, पुतळ्याचे काम 8 सप्टेंबर रोजी सुरू झाले. त्यानंतर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर रोजी नौदल दिनी करण्यात आले.