Chhatrapati Sambhajinagar Car Accident: 7 वर्षांपूर्वी जिथे आईचा अपघात तिथेच कार वरील नियंत्रण सुटल्याने 17 वर्षीय मुलाचा मृत्यू
याच परिसरामध्ये आता सोहमचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अल्पवयीन मुलाच्या हातात गाडीचं स्टिअरिंग देणं जीवावर बेतल्याची अजून एक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये एका 17 वर्षीय मुलाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि जीव गेल्याची घटना समोर आली आहे. विचित्र योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी या मुलाच्या आईचा 7 वर्षांपूर्वी मृत्यू झाला त्याच ठिकाणी या मुलाचाही अपघात होऊन मृत्यू झाला आहे. जालना रस्त्यावरून सेव्हन हिल्सच्या दिशेने जाताना कारचा वेग 120 पर्यंत पोहचला होता आणि याच वेगाने मुलाचा जीव घेतला.
आकाशवाणी चौकाजवळ असताना त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. कार 70 फूट घासत स्कायवॉकच्या पिलरला आदळली. त्यामध्ये गाडीचा चेंदामेंदा झाला. ही घटना गुरूवार, 2 मार्चच्या रात्रीची आहे. दहावी मध्ये शिकणारा हा मुलगा जागीच ठार झाला आहे. मृत मुलाचे नाव सोहम नीरज नवले आहे.
सोहम गजानन मंदिर परिसरामध्ये एस्सार पेट्रोल पंपच्या मागील सुलोचना अपार्टमेंट राहत होता त्याचे वडील व्यावसायिक आहेत. संध्याकाळी वडील आणि बहिणीसोबत तो जेवायला गेला होता. रात्री घरी परतल्यानंतर त्याने शहरात फेरफटका मारण्यासाठी गुपचूप गाडी काढली. वडीलांची ह्युंडाय असेंट कार तो चालवत होता.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सोहमची कार 70 फूट डिव्हायडरच्या दिशेने घासत जात थेट त्यावर चढली आणि नंतर स्कायवॉकच्या पिलरला आदळली.
ब्रेक घासत जात असताना आवाज आला तोच काही सेकंदांत स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमनचे जवान व 13 जणांनी कारचा दरवाजा ओढून त्याला बाहेर काढले.
2016 मध्ये सोहमची आई आणि मामेभावाचा एसएफएस शाळेसमोर रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता. याच परिसरामध्ये आता सोहमचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.