चंद्रपूर: मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस; 11 व्या वर्षी अपहरण करून, नऊ वर्षांत 7 वेळा विक्री झालेल्या तरुणीची सुटका
एका मुलीचे 11 व्या वर्षी अपहरण करून, गेल्या नऊ वर्षांत तिची तब्बल 7 वेळा विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.
साईबाबांच्या शिर्डीमध्ये मानवी तस्करी (Human Trafficking) चालू असावी असा संशय बळावत असताना, आता चंद्रपूर (Chandrapur) मध्ये एक मानवी तस्करी मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका मुलीचे 11 व्या वर्षी अपहरण करून, गेल्या नऊ वर्षांत तिची तब्बल 7 वेळा विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.
आता दहा वर्षांनतर पोलिसांनी या मुलीची सुटका केली आहे. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. तर हरयाणा पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. हरियाणातील फतेहाबादमधून या मुलीची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2010 साली चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बंगाली कॅम्प परिसरात एका अकरा वर्षीय मुलीला प्रसादातून गुंगीचे औषध देत काही तरुणांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर हरियानामधील पानिपत येथे तिची विक्री करण्यात आली. ज्या व्यक्तीने तिला खरेदी केले होते, त्या इसमाने या मुलीला आपल्या शेतावरील खोलीत डांबून ठेवले होते. यावेळी या व्यक्तीच्या मुलांनी या मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पुढे 9 वर्षांत तिची 7 वेळा विक्री झाली. शेवटी हरियाणा राज्यातीलच फतेहाबाद येथे सातव्यांदा तिला धर्मवीर नावाच्या इसमाला विकण्यात आले.
(हेही वाचा: मोठी कामगिरी: गुजरातमध्ये मानवी तस्करी उघडकीस; 125 मुलांना पोलिसांनी केले मुक्त)
या व्यक्तीने तिला एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते. कालांतराने घरमालकाला याचा संशय आला व त्याने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या मुलीची सुटका केली. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होता, त्यामुळे रामनगर पोलिसांच्या पथकाने फतेहाबाद येथून या मुलीला चंद्रपुरात परत आणले. या प्रकरणात आतापर्यंत जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली आहे. मात्र मानवी तस्करीचे हे रॅकेट खूप मोठे असल्याचा संशय आहे. तिकडे हरयाणा पोलिसांनीही या प्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.