चंद्रपूर मध्ये शाळेला दांडी मारल्याने पालक रागावू नये म्हणून 10 वर्षीय मुलाने रचला अपहरणाचा बनाव; क्राईम शो मधून कल्पना
मुलाच्या पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.
चंद्रपूर (Chandrapur) मध्ये दहा वर्षाच्या मुलाने शाळेला सुट्टी मारली म्हणून पालकांचा ओरडा बसू नये म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा एक प्रकार समोर आला आहे. एका मालवाहू चालकाने अपहरण केलं आणि त्याच्या तावडीमधून कसाबसा सुटलो अशी थाप त्याने पालकांना मारली. मुलाच्या पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांची तपास सुरू केला पण कालांतराने त्यांनाही हा बनाव असल्याचं समजलं आणि मुलानेही ते कबुल केलं.
मुलगा घरी उशिरा का आला हे पालकांनी विचारताच त्याने आपलं अपहरण झाल्याचं सांगितलं. पोलिसांसमोरही त्याने खोटी कहाणी रेटून सांगितली. पोलिसांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. फूटेज तपासलं पण हाती काहीच लागलं नाही. मुलाने सांगितलेला प्रकार आणि समोर दिसणारं दृश्य मेळ खात नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी मुलाला विश्वासात घेऊन अधिक माहिती काढली तर खरा प्रकार समजला. नक्की वाचा: Sangli: नर्स असल्याचे भासवून एक दिवसाचे बाळ बॅगेत घेऊन गेली पळून, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video) .
दरम्यान मुलाने पालकांचा ओरडा बसू नये म्हणून क्राईम शो पाहून ही शक्कल लढवल्याचं सांगितलं. चंद्रपूरातील या घटनेमुळे आजकाल मुलांवर टेलिव्हिजन शो, मोबाईल गेम्स यांचा कळत नकळत किती खोल परिणाम होऊ शकतो याचा अंदाज आला असेल. पोलिसांनी देखील आपली मुलं टीव्ही, मोबाईल यावर काय पाहत आहेत? याकडे लक्ष देणं गरजेचे आहे असे म्हणाले आहेत. चंद्रपूरात ही घटना पडोली मध्ये घडली आहे.