'पंकजा मुंडे भाजप सोडणार का?' पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील

त्यामुळे त्या भाजप पक्ष लवकरच सोडणार तर नाहीत ना अशा चर्चांना सध्या उधाण आलेलं दिसून येत आहे.

पंकजा मुंडे (फोटो सौजन्य-फेसबुक)

Pankaja Munde's exit from BJP: भाजपचं सरकार असताना महिला बाळ कल्याण आणि ग्रामविकास या दोन खात्यांचा पदभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं अशा पंकजा मूंडे यांना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. आपली पकड ज्या मतदारसंघात घट्ट आहे अशा परळी विभागातून त्यांना हार पत्करावी लागली तर तिथूनच त्याचा भाऊ धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. या सर्वामुळे, पंकजा मुंडे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली. त्यामुळे त्या भाजप पक्ष लवकरच सोडणार तर नाहीत ना अशा चर्चांना सध्या उधाण आलेलं दिसून येत आहे.

परंतु, या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी, भाजप पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे पक्ष सोडणार का या विषयी एक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "पंकजा मुंडे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात."

'पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात' संजय राऊत यांचा खळबळजनक दावा 

दरम्यान 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांची जन्मतिथी साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक नेते गोपीनाथगडावर येतात. त्यादृष्टीने तयारीला सुरुवात देखील करण्यात आली आहे असंही चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.