Central Railway Ambernath Karjat: मध्य रेल्वे मार्गावर 1 ठार, तीन जखमी, वाहतूक विस्कळीत; रूळ दुरुस्त करणारी मशिन घसरल्याने अपघात

रेल्वे सुरु झाली असली तरीदेखील ती अद्यापही सर्वसामान्य लोकांसाठी खुली नाही. केवळ महिला आणि अत्यावश्यक सेवेतील खासगी आणि सरकारी कर्मचारी तसेच राज्य सरकारची परवानगी घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेप्रवासाची मुभा आहे

Central Railway | (Photo Credit: ANI)

मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway Services) अंबरनाथ ते कर्जत (Ambernath to Karjat) दरम्यान वाहतूक विस्कळीत (Central Railway Services Disrupted) झाली आहे. या मार्गादरम्यान रेल्वे रुळ दुरुस्त करणारी मशीन घसरुन अपघात घडला. या अपघातात एक मजूर ठार झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अंबरनाथहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली. वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी रात्री हा अपघात अंबरनाथ-बदलापूर दरम्यान घडला. या मार्गादरम्यान काही कामगार मशीनच्या सहाय्याने रेल्वे रुळ दुरुस्त करत होते. दरम्यान हे मशीनच रुळावरुन घसरले. त्यामुळे अपघात घडला. यात एक कामगार ठार झाला आणि तिघेजण जखमी झाले. घसरलेले मशीन रुळावर घेऊन बाजूला करण्यास काही अवधी लागणार आहे. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Local: सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज; मात्र, राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा - मध्य रेल्वे)

कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळापासून स्थगित करण्यात आलेली रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहे. रेल्वे सुरु झाली असली तरीदेखील ती अद्यापही सर्वसामान्य लोकांसाठी खुली नाही. केवळ महिला आणि अत्यावश्यक सेवेतील खासगी आणि सरकारी कर्मचारी तसेच राज्य सरकारची परवानगी घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेप्रवासाची मुभा आहे. त्यामुळे रेल्वे कधी पूर्वपदावर येणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, येत्या 29 जानेवारीपासून मुंबई लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेने सुरु केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगरिय रेल्वेसाठी एक आढावा बैठक पार पडली. त्यानंतर रेल्वेने नागरिकांसाठी चांगले संकेत दिले आहेत.